मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्या आमदारांच्या परवानगीने वर्ग केला जात आहे का? हे तपासण्याची यंत्रणा शासनाने उभी करावी, अशी मागणी आ. लाड यांनी बुधवारी विधानपरिषदेत माहितीच्या मुद्द्याद्वारे केली. यापूर्वी श्रीकांत भारतीय, उमा खापरे, निरंजन डावखरे तर सभापती होण्यापूर्वी प्रा. राम शिंदे यांनाही असाच अनुभव आल्याचे लाड यांनी सांगितले.
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
विधानपरिषदेतील आमदारांचा निधी राज्याच्या कोणत्याही भागात वापरता येऊ शकतो. हीच संधी साधून ही अफरातफर करण्यात आली, असे लाड यांनी सभागृहात सांगितले. रत्नागिरीच्या नवीन डीओपींना याची शंका आल्याने त्यांनी मंगळवारी फोन करून बीड जिल्ह्यासाठी काही निधी दिला आहे का? अशी विचारणा केली. मात्र, असा निधी दिला नसल्याने संबंधितांकडून त्याची माहिती मागविली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आल्याचे आ. लाड यांनी सांगितले. सभापती शिंदे यांनी यावर हा गंभीर प्रकार असून, याप्रकरणी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले.
नेमके काय घडले?
बनावट लेटरहेड, बनावट सही आणि हुबेहूब आवाज काढून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली.
लाड यांच्या आवाजात एआय कॉल करून निधी त्वरित वर्ग करा, असे रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
बीडचे नाव आल्याने सावध झालो : लाड
माझ्या नावाचा गैरवापर करून निधी चोरण्याच्या प्रकाराची सायन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस आयुक्त व मुख्यमंत्री यांनाही माहिती दिली असून तपासादरम्यान ४ जणांची नावे समोर आली आहेत. त्यातील एकाचे नाव बंडू आहे. तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती असून बीड जिल्ह्याचे नाव समोर आल्याने सावध झालो, असे लाड यांनी पत्रकारांना सांगितले.
राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांचेही लेटरहेड वापरून निधी वळवण्याचा प्रयत्न
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सभापती नव्हते पण आमदार म्हणून त्यांच्या लेटरहेडवर ५० लाख रुपयांची कामे सुचवण्यात आली होती आणि ते पत्र मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते. मात्र, ही बाब शिंदे यांच्या वेळीच लक्षात आली त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
विधान परिषदेचे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनाही असाच अनुभव आला त्यांच्या लेटरहेडवर दहा लाख रुपयांची कामे सुचवण्यात आली होती तसे पत्र मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले, पण भारतीय यांच्या सतर्कतेमुळे ते वेळीच थांबवण्यात आले होते.
फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे
आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीमध्ये प्रशांत लांडे, नीलेश वाघमोडे, सचिन बनकर या व्यक्तींचा उल्लेख आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता का याची चौकशी आता सुरू झाली आहे.
प्रसाद लाड हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असताना त्यांचे जे लेटरहेड होते त्या लेटरहेडचा वापर करण्यात आला. या लेटरहेडवर असलेला मोबाईल क्रमांकही चुकीचा असल्याचे समोर आले आहे. सचिन बनकर याला प्रसाद लाड यांच्या पीएने फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असेही तक्रारीत म्हटले आहे.