लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला
By दीपक भातुसे | Updated: May 3, 2025 09:11 IST2025-05-03T09:09:31+5:302025-05-03T09:11:15+5:30
राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला
दीपक भातुसे
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या दोन्ही विभागांचे अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागासाठी सहायक अनुदान म्हणून ३ हजार ९६० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे. आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहायक अनुदानातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला. या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे.
एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.
अदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री