मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या चालकांकडून मंगळवारपासून परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारणार आहे. पीक अवरचे भाडे सरसकट घेता येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. छोट्या गाड्यांसाठी २८, तर मोठ्या गाड्यांसाठी ३४ रुपये प्रतिकिमी दर निश्चित केला आहे. मात्र अधिक भाडे घेतल्यास चालकांवर नव्हे कंपन्यांवर कारवाई होणार आहे.
प्रति किमी २२.७२ रुपये भाडे ठरवले आहे. गाड्यांच्या मागणीच्या कालावधीत हे भाडे १.५ पटची मुभा संस्थेला असेल. मागणी नसलेल्या काळामध्ये २५ टक्के कमी भाडे आकारण्याची सवलत दिली आहे. परंतु १८ सप्टेंबरपासून परिपत्रक काढूनही ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांनी नवीन भाडे लागू केले नाही. त्यामुळे सरसकट दीडपट भाडे घेणार असल्याचे भारतीय गिग कामगार मंचचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
नागपुरात अनेक रिक्षांवर कारवाईचा बडगानागपूर शहरामध्ये रॅपिड टॅक्सी आणि ऑटो रिक्षावर २० आणि २१ सप्टेंबरला आरटीओने कारवाई केली. कारवाईत ६ टॅक्सी आणि ४ ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. रॅपिडो संस्था कोणत्याही ॲग्रीगेटर परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक व्यवसाय करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे परिवहनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संस्थेऐवजी चालकांना भूर्दंड ॲपपवर दाखविल्यापेक्षा कमी किंवा जास्त भाडे आकारल्याबद्दल देखील काही दिवसांपूर्वी विरारमध्ये चालकांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु ही कारवाई संबंधित संस्थेवर करण्याऐवजी वाहनचालकांवर का केली जात आहे, असा सवाल चालकांकडून परिवहन विभागाला विचारला जात आहे.
यामुळे प्रवासी हाेणार त्रस्तराज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी परिपत्रक काढून कंपन्यांना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवीन दर ॲप मध्ये लागू करण्याची मुदत दिली होती. परंतु ४८ तास उलटूनही कंपन्यांनी आरटीओच्या निर्देशाचे पालन केलेले नाही तसेच अधिकाऱ्यांनाही जुमानलेले नाही. कंपनी ॲपवर जोपर्यंत नवीन दर दाखवत नाही तोपर्यंत आम्ही पीक अवरचे म्हणजेच दीड पट भाडे आकारणार असल्याचे केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे. मात्र, त्यामुळे कंपनी आणि चालकांच्या भांडणात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.