Join us

मैत्री, प्रेम आणि धोका..., एकतर्फी प्रेमातून पाठवले अश्लील मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 04:45 IST

दोघीही जीवलग मैत्रिणी. पाहता पाहता एकीचे लग्न जुळले.

- मनीषा म्हात्रे मुंबई : दोघीही जीवलग मैत्रिणी. पाहता पाहता एकीचे लग्न जुळले. मात्र मैत्रिणीचा होणारा पतीच मनात भरल्याने ती त्याच्यावर एकतर्फी प्रेम करू लागली आणि त्याला मिळविण्यासाठीची जीवघेणी धडपड सुरू झाली. याबाबत अनभिज्ञ असलेल्या मैत्रिणीचा त्याच्यासोबत साखरपुडा झाला. मात्र तरीही हिचे प्रयत्न सुरू होते. तिने बोलता बोलता त्याचा क्रमांक मिळवला आणि मैत्रिणीसोबतचे लग्न मोडून तो आपला व्हावा म्हणून तिने मैत्रीण चारित्र्यहीन असल्याचे अश्लील मेसेज धाडले. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचताच मैत्री, प्रेम आणि त्यामागच्या फसवणुकीवरील नाट्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पवई परिसरात २१ वर्षीय रेहाना (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. तिच्याच शेजारी तिची मैत्रीण सना सिद्दिकी (२२) राहण्यास आहे. दोघीही जीवलग मैत्रिणी. सोबतच शाळा, कॉलेज केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये रेहानाला लग्नासाठी स्थळ आले. मुलगा उच्चशिक्षित तसेच देखणा असल्याने रेहानालाही तो आवडला. तिने होकार कळविताच जानेवारीमध्ये तिचा साखरपुडा झाला. मात्र पहिल्या भेटीतच सनाही त्याच्या प्रेमात पडली. साखरपुड्याच्या दिवशी तिने रेहानाकडे त्याला खासगीत भेटण्यासाठी आग्रह धरला. मात्र त्याने नकार दिला.हा प्रकार रेहानाच्या भावाच्या लक्षात येताच, त्याने सनाला बहिणीपासून दूर ठेवायला सुरुवात केली.आॅगस्ट २०१८ मध्ये रेहानाच्या पतीच्या बहिणीचे लग्न ठरले होते. या दरम्यान सनाही या लग्नात सहभागी झाली होती. सना हिने इन्स्टाग्रामवर रेहानाच्या पतीला शोधून काढले. त्याच्या मित्रांची यादी पाहिली आणि बनावट खाते तयार करून त्याच्या एका मित्राला संदेश धाडला. त्यात रेहाना चारित्र्यहीन आहे. तिच्याशी लग्न करून मित्राचे नुकसान होईल, असे म्हणत त्याला लग्न तोडण्याचे संदेश धाडले. या संदेशामुळे मित्राच्याही भुवया उंचावल्या. लग्न उरकल्यानंतर त्याने हा प्रकार रेहानाच्या होणाऱ्या पतीला सांगितला. त्याने याचे स्क्रीनशॉट काढून रेहानाच्या कुटुंबीयांना दाखविले. त्यांनाही धक्का बसला. त्यांच्याकडून शोध सुरू झाला.

टॅग्स :मोबाइल