शिवसेनेसोबतची मैत्री काँगे्रसला पडली महागात
By Admin | Updated: February 21, 2015 01:27 IST2015-02-21T01:27:26+5:302015-02-21T01:27:26+5:30
पालिकेची पोटनिवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँगे्रसने शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली होती.

शिवसेनेसोबतची मैत्री काँगे्रसला पडली महागात
नामदेव मोरे - नवी मुंबई
पालिकेची पोटनिवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँगे्रसने शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली होती. महापालिकेमध्ये राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर करण्यासाठी महाआघाडी करण्याची तयारी सुरू केली होती. राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता मैत्रीचा पुढे केलेला हात काँगे्रसला चांगलाच महागात पडला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी काँग्रेसमध्ये फुट पाडली असून सेनेने केलेल्या फसवणुकीविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे.
नवी मुंबईच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांची एकहाती पकड आहे. नाईकांना रोखणे आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला शक्य झाले नाही. यामुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरच त्यांना सत्तेपासून दूर करता येणे शक्य असल्याचे शहरातील इतर पक्षांच्या लक्षात आले. सर्वपक्षीयांची एकजूट बांधण्यासाठी काँगे्रसने दोन वर्षांपूर्वी पुढाकार घेतला. वाशीतील पोटनिवडणुकीमध्ये काँगे्रसचा उमेदवार असताना पक्षाच्या नेत्यांनी सेनेला मदत केली. लोकसभा निवडणुकीमध्येही राष्ट्रवादीला रोखण्यासाठी काँगे्रसच्या नेत्यांनी शिवसेनेला मदत केली. काँगे्रसचे नगरसेवक व पदाधिकारी उघडपणे सेनेला मदत करा, असे आवाहन करत होते. सोशल मीडियातून हाताचा वापर करून धनुष्यबाणाने घड्याळ फोडा, असे संदेश पाठविले जात होते. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा शिवसेनेला नवी मुंबईतून तब्बल ४६ हजार मतांची आघाडी मिळाली. यामध्ये काँगे्रसचाही सिंहाचा वाटा होता. विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातून विजय नाहटा यांना तिकीट मिळावे, असा आग्रह काँगे्रसच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केला होता. निवडणुकीत काँगे्रसने उमेदवार उभा केला होता. तरीही नाईकांना रोखण्यासाठी स्वत:च्या उमेदवाराचा प्रचार न करता काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी सेनेला मदत केली.
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेची सत्ता नाईकांच्या ताब्यातून हिसकावण्यासाठी महाआघाडी तयार करण्यासाठी काँगे्रसने पुढाकार घेतला होता. लोकसभा, विधानसभा व पोटनिवडणुकीत मदत केल्यामुळे शिवसेना महापालिकेत मदत करेल, असा विश्वास काँगे्रसला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र शिवसेनेने काँगे्रसमध्ये उभी फुट पाडली आहे. आतापर्यंत चार नगरसेवक शिवसेनेमध्ये घेतले आहेत. काही दिवसांत चार नगरसेवक प्रवेश करणार आहेत. शिक्षण मंडळ सदस्य व अल्पसंख्याक विभागाचे प्रमुखही सेनेत दाखल झाले आहेत. सेनेशी केलेली मैत्री न आवडल्यामुळे यापूर्वीच जनार्दन सुतार व संगीता सुतार यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
शिवसेनेने धोका दिल्याची भावना निर्माण झाली आहे. काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या नेत्यांशी संपर्क साधून आम्ही तुम्हाला सहकार्य केले. परंतु तुम्ही आमचे नगरसेवक का फोडत आहात, असे विचारले. परंतु आम्ही नाही घेतले तर ते भाजपात जातील असा युक्तिवाद करण्यात आला. यामुळे काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
च्काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही शिवसेनेला पोटनिवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार्य केले. परंतु सेनेने आमचेच नगरसेवक फोडून पाठीत खंजीर खुपसला, अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.
च्मैत्रीची परतफेड अशी का, याविषयी विचारणा केल्यानंतर आम्ही घेतले नाहीत तर तुमचे नगरसेवक भाजपात गेले असते, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. हा युक्तिवाद न पटण्यासारखा आहे. सेनेने राजकीय मुत्सद्देगिरी दाखविली असून त्यांचे विचार त्यांच्यासोबत राहो. यापुढे मात्र अशा विचारसरणीबरोबर मैत्री न करण्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
च्नवी मुंबईतील जनता सुज्ञ आहे ती योग्य तो निर्णय घेईल व कोणाला जनतेची बांधिलकी आहे व कोण दगाबाज याचा निर्णयही जनताच घेईल, असे मत व्यक्त केले जात आहे.