मेहुणीला धडा शिकवण्यासाठी फ्रान्शेलाची हत्या
By Admin | Updated: July 4, 2015 03:10 IST2015-07-04T03:10:47+5:302015-07-04T03:10:47+5:30
तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या ऐेरोलीतील फ्रान्शेला वाझ (८) या मुलीची हत्या झाल्याचे शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) या फ्रान्शेलाच्या

मेहुणीला धडा शिकवण्यासाठी फ्रान्शेलाची हत्या
नवी मुंबई : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या ऐेरोलीतील फ्रान्शेला वाझ (८) या मुलीची हत्या झाल्याचे शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) या फ्रान्शेलाच्या काकाला पोलिसांनी अटक केली. मेहुणीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी फ्रान्शेलाची हत्या केल्याची क्लेअरन्सने कबुली दिली.
फ्रान्शेला ऐरोली सेक्टर ८ येथील एकवीरा दर्शन या सोसायटीच्या आवारातून बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी तपासाकरिता ११ पथके तयार केली होती. अखेर तपासात तिच्या मावशीचे पती (काका) क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) याने तिची हत्या करून मृतदेह घोडबंदर रोडवर गायमुख येथील रस्त्यालगतच्या झाडीमध्ये टाकला होता. यानुसार क्लेअरन्सला अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
फ्रान्शेलाचे वडील कामानिमित्त नेदरलँडला गेले असून तिच्या आईचीही प्रकृती ठीक नसल्याचे त्याला माहीत होते. त्यामुळे एकटीच शाळेतून ये-जा करणाऱ्या फ्रान्शेलाचे त्याने सोमवारी अपहरण केले. त्यानंतर तिची आई मीरा रोड येथील घरी असल्याचे सांगून तिला सोबत नेले. घोडबंदर मार्गावर एकांतात तिची हत्या केली. ती अनोळखी व्यक्तीसोबत जात नसल्याने पोलिसांनी कुटुंबावर पाळतही ठेवली होती. (प्रतिनिधी)
अपमानाचा बदला घेतला
मे महिन्यात शेली ह्या सहकुटुंब छोट्या बहिणीच्या (क्लेअरन्स) घरी गेल्या होत्या. या वेळी त्यांच्या मुलांच्या भांडणावरून शेली व क्लेअरन्स यांच्यातही कडाक्याचे भांडण झाले होते.
या वेळी ‘तू इकडे येण्याऐवजी समुद्रातच मर’ असे उद्गार शेली यांनी काढले होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी २९ जून रोजी त्याने फ्रान्शेलाचे अपहरण केले.
ड्रायव्हिंग लायसन्स ठरले महत्त्वाचा पुरावा :
घटनेच्या दिवशी घरी पोचायला उशीर झाल्यामुळे आपली फाइल चोरीला गेल्याचा बहाणा त्याने केला. तसेच चोरांचा पाठलाग करताना पडलेली फाइल आणायची असल्याचे सांगून तो मित्राला घेऊन पुन्हा घटनास्थळी गेला होता. तिथून परत येताना त्याचे पडलेले ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांच्या हाती लागले.