ताजी भाजी मळ्यातून थेट घरात
By Admin | Updated: May 14, 2015 22:53 IST2015-05-14T22:53:58+5:302015-05-14T22:53:58+5:30
ठाणे तसेच पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सात महापालिकांसह सात नगरपालिकांचा शहरी भागातील ग्राहकांना शेतातील भाजी थेट पुरविण्याची योजना

ताजी भाजी मळ्यातून थेट घरात
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे तसेच पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सात महापालिकांसह सात नगरपालिकांचा शहरी भागातील ग्राहकांना शेतातील भाजी थेट पुरविण्याची योजना हाती घेतली गेली आहे. येथील नागरिकांकडून ताज्या भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ती पूर्ण करण्यासाठी भाजीपाल्याचे क्षेत्र वाढविण्याकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी नगदी पीक म्हणून भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
मुुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील मोठी बाजारपेठ जवळच उपलब्ध असल्यामुळे भाजीपाल्याची विक्री सहज शक्य आहे. याशिवाय, ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळवून देणे शक्य होणार आहे. मळ्यातील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचती होणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या हाती नगद पैसा येईल. त्यामुळे त्यांची आर्थिक चणचणही दूर होण्यास मदत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना हवी ती मदत करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सक्रिय झाले आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशके, अवजारे, खतपुरवठा सुरू आहे.
भाजीपाला, हरितगृहे, शेततळे तसेच पशू व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कोरडवाहू धोरण, शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण, सहली, माती परीक्षण, यांत्रिकीशेतीवर भर दिला जात आहे. याशिवाय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, रायपनिंग चेंबर, प्लॅस्टिक मिल्चंग आच्छादन, शेडनेट, सूक्ष्म सिंचन अभियान, आंबा पिकावरील कीडरोग सर्वेक्षण, शेतकरी जनता अपघात योजना, मत्स्यबीजसंवर्धन, परसबाग, तलावाचे सुशोभीकरण आदी कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.