वारंवार वीजपुरवठा खंडित

By Admin | Updated: July 15, 2015 23:28 IST2015-07-15T23:28:48+5:302015-07-15T23:28:48+5:30

काही महिन्यापासून घोडबंदरमधील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात मंगळवारी महावितरणने अघोषित भारनियमन सुरु केल्याचा

Frequent power supply breaks | वारंवार वीजपुरवठा खंडित

वारंवार वीजपुरवठा खंडित

ठाणे : काही महिन्यापासून घोडबंदरमधील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात मंगळवारी महावितरणने अघोषित भारनियमन सुरु केल्याचा फटका या भागाला सर्वाधिक बसला.
विशेष म्हणजे या भारनियमनातून सावरत नाही तोच रात्री पुन्हा महावितरणने घोडबंदरकरांचे तीन तेरा वाजवले. रात्री ११ च्या सुमारास तब्बल तीन तासाहून अधिक काळ येथील अर्ध्याहून अधिक भाग अंधारात चाचपडत होता. वीजपुरवठा का खंडीत झाला, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, सर्वच अधिकाऱ्यांचे एकाच वेळी मोबाइल बंद असल्याने नागरिकांच्या रोषात आणखी भर पडली. परंतु, महावितरणला जाब विचारण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा आमदार पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच घोडबंदरच्या अनेक भागांत वारंवार वीज खंडित होत आहे. विशेष म्हणजे महावितरणच्या ग्रेड १ मध्ये हा भाग येत असतांनाही भारनियमनला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरु झाला आणि यात आणखीनच भर पडली आहे. जून महिन्यापासून जुलै महिना संपत आला तरी, महावितरणच्या मते येथील कामे आजही प्रलंबित आहेत. भूयारी योजनेला निधी नसल्याचेही कारण पुढे केले जात आहे. त्यामुळेच या भागात वीज खंडित होत असल्याची ओरड महावितरणकडून केली जाते. परंतु वेळी अवेळी वारंवार ती खंडित होत असल्याने येथील नागरिक अधिकच हैराण झाले आहेत.
मंगळवारी यात आणखी भर पडली. सकाळी दोन तास आणि दुपारी दोन तास अशा दोन टप्प्यात अचानक महावितरणने अघोषित भारनियमन केल्यानंतर रात्री तरी वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी आशा येथील नागरिकांना होती. परंतु रात्री ११ वाजता पुन्हा तो खंडीत झाला. याचा जाब विचारण्यासाठी अनेकांनी महावितरणच्या कार्यालयासह त्यांच्याकडून देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाइलवरही कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, ते सर्वच नंबर नॉटरिचेबल आणि बंद होते. (वार्ताहर)

Web Title: Frequent power supply breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.