Join us

‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 09:08 IST

भारतीय रेल्वे पूर्व आणि पश्चिम असे दोन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बांधत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय रेल्वेशी संलग्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (डीएफसीसीआयएल) न्यू सफाळे ते खारबाव दरम्यान नव्याने तयार झालेल्या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर मालगाडीची यशस्वी चाचणी पूर्ण केली. जेएनपीए–वैतरणा विभाग सुरू करण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

भारतीय रेल्वे पूर्व आणि पश्चिम असे दोन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बांधत आहे. त्यातील १,३३७ किलोमीटर लांबीचा पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर लुधियाना ते सोननगरला जोडणार असून १,५०६ किलोमीटर लांबीचा पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर नवी मुंबईतील जेएनपीटी ते उत्तर प्रदेशातील दादरीपर्यंत जोडला जाणार आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर वसई रोड–कोपर विभागातील रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.  

मालवाहतूक नेटवर्कशी थेट कनेक्टिव्हिटी

जेएनपीटी–वैतरणा मार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर जेएनपीटीचे देशव्यापी समर्पित मालवाहतूक नेटवर्कशी थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. त्यामुळे रस्ते आणि पारंपरिक रेल्वेमार्गावरील भार कमी होणार आहे. वेग, कार्यक्षमता, वेळेमध्येही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. खारबाव ते जेएनपीएदरम्यान उर्वरित कामे सध्या गतीने सुरू असून शीळफाटा रोड ओव्हर ब्रिजचे पाडकाम आणि कळंबोली रेल फ्लायओव्हरचे बांधकाम हे या विभागातील प्रमुख टप्पे आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्य सरकारशी समन्वय साधून ही कामे पूर्ण केल्यास प्रकल्प अंतिम टप्प्यात जाईल.

५ राज्यांतून जाणारा रेल्वेमार्ग : पश्चिम समर्पित कॉरीडॉर उत्तर प्रदेश (१८ किमी), हरियाणा (१७७ किमी), राजस्थान (५६५ किमी), गुजरात (५६५ किमी) आणि महाराष्ट्र (१७७ किमी) या पाच राज्यांमधून जातो. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीसाठी पूर्णपणे स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : JNPA-Vaitarna Freight Train Successful; Key Step in Dedicated Freight Corridor

Web Summary : Successful freight train trial on the new JNPA-Vaitarna rail line marks progress in the Dedicated Freight Corridor project, easing rail traffic and enhancing connectivity. The corridor promises faster, more efficient freight transport across five states, reducing road congestion.
टॅग्स :जेएनपीटी