Join us

२० लाख घरांना मोफत सौरऊर्जा: CM फडणवीस; रस्त्यांचे काँक्रीटचे अन् भुयारी मेट्रोची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 06:06 IST

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाकरिता संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान आवास योजनेतील २० लाख घरांना मोफत सौरऊर्जा पुरविली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना शुक्रवारी विधानसभेत दिली. 

राज्यातील ७० टक्के घरगुती ग्राहक हे दरमहा ० ते १०० युनिट वीज वापरतात. नवीन योजनेतून ही कुटुंबे घरावर सोलर पॅनल बसवू शकतील व वीज बिलमुक्त होतील. १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. यामुळे ९५ टक्के घरगुती ग्राहकांना दर कपातीचा थेट लाभ मिळेल. ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले, तर दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत मिळेल, असे ते म्हणाले. 

कोस्टल रोड, मेट्रोला गती

मुंबई शहरात सुरू असलेले मेट्रोचे जाळे अधिकाधिक भक्कमपणे विणण्याचे काम सुरू आहे. देशातील सर्वांत लांब भुयारी मेट्रो मार्ग ३ जून २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्यात येईल. पुढील तीन वर्षांत मेट्रोची कामे पूर्ण करण्यात येतील. भिवंडी ते ठाणे या मेट्रो मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून भिवंडी ते कल्याण मार्गही पूर्ण करण्यात येईल.  

नंबर प्लेट दर तुलनेत कमी 

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटचे राज्यातील दर इतर दरांच्या तुलनेत कमी आहेत. राज्यातील दर हे फिटमेंट चार्जेससह आहेत. याबाबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या मान्यतेनंतरच एचएसआरपीचे दर ठरविण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

सोयाबीनची विक्रमी खरेदी 

सोयाबीन खरेदीला दोनवेळा मुदतवाढ मिळालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य. आणखी मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राला पाठविला आहे. ११ लाख २१ हजार ३८५ मेट्रिक टन इतकी विक्रमी खरेदी राज्याने केली.  तुरीचे ११ लाख टन उत्पादन अपेक्षित असून गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलमागे ५०० रुपये अधिक भाव दिला आहे.  

शक्तिपीठ मार्ग करणार 

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाकरिता संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महत्त्वाकांक्षी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी मिळाली असून यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. तसेच वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

१४ हजार किमी रस्ते  काँक्रीटचे होणार

राज्यात ग्रामीण भागातील १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. १ हजार लोकसंख्येच्या ४ हजार गावांत काँक्रिटीकरणाचा प्रकल्प राबविला जाईल.  

 

टॅग्स :विधानसभादेवेंद्र फडणवीसराज्य सरकार