संमेलनासाठी केडीएमटीची मोफत सेवा
By Admin | Updated: January 24, 2017 05:33 IST2017-01-24T05:33:50+5:302017-01-24T05:33:50+5:30
डोंबिवलीत ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या नव्वदाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. संमेलनाच्या

संमेलनासाठी केडीएमटीची मोफत सेवा
कल्याण : डोंबिवलीत ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या नव्वदाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. संमेलनाच्या तिन्ही दिवशी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बस साहित्यप्रेमींना मोफत सेवा देणार आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सोमवारी यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांना सूचना केल्या. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी बसवर संमेलनाचे बॅनर लावण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हे साहित्य संमेलन होत आहे. काही कार्यक्रम शेजारील सावित्रीबाई फुले कलामंदिरात होत आहेत. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने या क्रीडासंकुलाच्या आवारातील रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांना रंगरंगोटी करण्यास सुरुवात केली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून केडीएमसीकडून आता संमेलनाच्या तिन्ही दिवशी मोफत बससेवा पुरवली जाईल. त्यासाठी तीन बस ठेवल्या जाणार आहेत. ‘कल्याण रेल्वे स्थानक ते डोंबिवली रेल्वे स्थानक’ या मार्गाने धावणारी बस संमेलनाच्या ठिकाणाहून जाईल. या बसवर ‘साहित्य संमेलन विशेष बस’ असा फलक असेल. साहित्य संमेलनाचा आणि महापालिकेचा लोगोही बसच्या दोन्ही बाजूस पोस्टर्स किंवा स्टिकर्सवर असणार आहे. त्यावर, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने साहित्यिक आणि साहित्यप्रेमींचे स्वागत, असा मजकूर असेल. (प्रतिनिधी)