फुकट्या प्रवाशांनो, सावधान! रोज होतेय बसेसची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:07 IST2021-09-27T04:07:36+5:302021-09-27T04:07:36+5:30

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात एस.टी. महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. ...

Free passengers, beware! Daily inspection of buses | फुकट्या प्रवाशांनो, सावधान! रोज होतेय बसेसची तपासणी

फुकट्या प्रवाशांनो, सावधान! रोज होतेय बसेसची तपासणी

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात एस.टी. महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. एस.टी. महामंडळाच्या पथकाकडून रोज बसेसची तपासणी करण्यात येत आहे. एस.टी.तून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.

मुंबई विभागाकडूनही पाच आगारांत विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोना संसर्ग ओसरल्याने बसेस पूर्ववत झाल्या आहेत. लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातही बहुतांश बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

सध्या प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे; परंतु आजही काही फुकटे प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अंकुश बसविण्यासाठी एसटी महामंडळाने लक्ष्य केंद्रित केले आहे. एसटी महामंडळाची पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली असून, कुठेही बसची तपासणी करण्यात येईल. २२ सप्टेंबरपासून बसेसची अशी तपासणी करण्यात येत आहे.

----

कुठेही, केव्हाही होऊ शकते तपासणी

जिल्ह्यात कुठेही आणि केव्हाही बसेसची तपासणी होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी एस.टी. बसने प्रवास करताना आपले तिकीट प्रवास होईपर्यंत जपून ठेवणे आवश्यक झाले आहे. २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.

--

या कायद्यानुसार अशी हाेते कारवाई

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सध्या एसटी महामंडळाच्या पथकांकडून जिल्ह्यातील बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर दंड करण्याची मोहीम सुरू झालेली आहे.

---

विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यांपैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येत आहे. तपासणी अधिकारी यांना बस तपासणीच्या वेळी प्रवाशांनी प्रवास केलेल्या मार्गाचे तिकीट दाखविणे आवश्यक आहे.

___-

एसटी बसने विनातिकीट प्रवास करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने प्रवास करताना सुरुवातीला आपले तिकीट घेणे आवश्यक आहे. ते पूर्ण प्रवास होईपर्यंत स्वत:जवळ सुरक्षित ठेवावे. प्रवाशांसह वाहकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या बसमध्ये किती प्रवासी आहेत, किती प्रवाशांनी तिकीट काढले हे तपासणी करणे आवश्यक आहे.

वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

Web Title: Free passengers, beware! Daily inspection of buses