मुंबईतील पोलिसांना मोफत अपघाती विमा
By Admin | Updated: September 3, 2015 02:11 IST2015-09-03T02:11:41+5:302015-09-03T02:11:41+5:30
अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असलेल्या मुंबईच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सुमारे ४५ हजार मुंबई पोलिसांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

मुंबईतील पोलिसांना मोफत अपघाती विमा
जमीर काझी, मुंबई
अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असलेल्या मुंबईच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सुमारे ४५ हजार मुंबई पोलिसांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रत्येक पोलिसाचा मोफत १० ते १५ लाखांपर्यंतचा वैयक्तिक अपघाती विमा काढण्यात येणार आहे. कॉन्स्टेबल ते साहाय्यक आयुक्त दर्जापर्यंत १० लाख आणि उपायुक्त व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी १५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी कसलेही शुल्क किंवा कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही. दरमहा शासनाकडून मिळणाऱ्या वेतन खात्याच्या (सॅलरी अकाऊंट्स) बदल्यात त्यांना सुविधा मिळणार आहे.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्याबाबत अॅक्सिस बॅँकेसोबत नुकताच एक करार केलेला आहे. त्यात अपघाती विम्यासह ‘झीरो बॅलेन्स’ सुविधा देण्यात आली आहे. राज्य पोलीस दलात सर्वाधिक ४५ हजार मनुष्यबळ मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आहे. दर महिन्याला त्यांच्या वेतनाची रक्कम शेकडो कोटींच्या घरात आहे. त्यामुळे हे चलन आपल्या बॅँकेमार्फत वितरित व्हावे, यासाठी सरकारी आणि खासगी बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ लागलेली असते. मात्र त्याबदल्यात अधिकाधिक लाभ खातेदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळावा, यासाठी आयुक्त मारिया व सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांनी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन अॅक्सिस बॅँकेमार्फत होत आहे. मात्र ‘झीरो बॅलन्स’ अकाऊंटशिवाय सभासदांना सोयीच्या ठरणाऱ्या अन्य सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे बॅँकेबरोबरील कराराची मुदत संपल्यानंतर ते पुढे सुरू ठेवण्यासाठी काही अटी घातल्या होत्या. त्यामुळे अपघाती विम्यासह अन्य विविध सुविधा देण्याचे बॅँकेच्या व्यवस्थापनाने मान्य केले. त्यानुसार अधिकारी/कर्मचाऱ्यांना सध्याचे एटीएम कम डेबिट कार्ड बदलून नवीन पॉवर सॅलुट डेबिट कम एटीएम कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.