मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात आयआरसीटीसीवरून तिकीट बुक करताना इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे हे एका एसी मेकॅनिकला चांगलेच महागात पडले. यात त्यांना सायबर भामट्यांनी २.१४ लाखांचा चुना लावला. सहार पोलिसांत तक्रार दिली आहे.
तक्रारदार अनवर अंसारी (४४) हे त्यांच्या मुलीच्या विवाहाची बोलणी करण्यासाठी झारखंडमध्ये असलेल्या त्यांच्या गावी जाणार होते. त्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे आयआरसीटीसीवरून त्यांचे आणि कुटुंबीयांचे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तांत्रिक कारणाने ॲप पासवर्ड स्वीकारत नव्हता. त्यामुळे अन्सारी यांनी गुगलवर आयआरसीटीसीचा कस्टमर केअर क्रमांक शोधला आणि तो डायल केला. कॉलरने तो आयआरसीटीसीमधून बोलत असल्याचे सांगत आपली काय अडचण आहे अशी विचारणा केली. त्यावर अन्सारी यांनी पासवर्ड समस्येबाबत माहिती दिली व कॉलरने त्यांना ॲप सुरू करत बुकिंग करायला सांगितले. मात्र, ती होत नसल्याने तुमचे ॲप बंद झाले असून तुमच्या मोबाइलवर तुम्ही एनी डेस्क हे ॲप डाउनलोड करा असे त्यांना सांगण्यात आले.