फेसबुकवर MBBSसाठी अॅडमिशनची फसवी जाहिरात, ४५ लाख रुपये उकळले!

By गौरी टेंबकर | Updated: January 7, 2025 17:55 IST2025-01-07T17:55:15+5:302025-01-07T17:55:43+5:30

एमबीबीएससाठी अॅडमिशन करून देतो असे सांगत नऊ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख उकळत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार साकीनाक्यात घडला.

Fraudulent advertisement for admission for MBBS on Facebook Rs 45 lakhs stolen | फेसबुकवर MBBSसाठी अॅडमिशनची फसवी जाहिरात, ४५ लाख रुपये उकळले!

फेसबुकवर MBBSसाठी अॅडमिशनची फसवी जाहिरात, ४५ लाख रुपये उकळले!

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: 

एमबीबीएससाठी अॅडमिशन करून देतो असे सांगत नऊ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख उकळत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार साकीनाक्यात घडला. याविरोधात फसलेल्या एका विद्यार्थिनीचे वडील तसेच आरबीआय बँक माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३१६(२),३१८ (४) अंतर्गत दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या मुलीने चेंबूरच्या एका कॉलेजमध्ये बारावीपर्यंत सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०२४ मध्ये वैद्यकीय प्रशिक्षणा करीता पात्रता नीट परीक्षा दिली ज्यात ती यशस्वी झाली. दाखल एफआयआर नुसार गेल्या वर्षी फेसबुकवर एक जाहिरात आली. ज्यामध्ये अंधेरी कुर्ला रोडवर असलेली सेज अकॅडमी ही एमबीबीएससाठी मॅनेजमेंट कोट्यामधून प्रवेश मिळवून देत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. ही जाहिरात तक्रारदाराने पाहिली आणि ३ नोव्हेंबर रोजी जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. फोन उचलणाऱ्या महिलेने तिचे नाव प्रतीक्षा आंग्रे असे सांगत आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये सांगलीच्या इस्लामपूरमधील अश्विनी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देतो असे सांगितले. आंग्रेने सांगितल्यानुसार तक्रारदार साकीनाका येथील सेज अकॅडमीच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी आंग्रेसह आराध्या चतुर्वेदी, रवींद्र साकेत यांची त्यांनी भेट घेतली ज्यांनी स्वतःला सेज अकादमीचे प्रमुख असल्याचे सांगितले. तसेच ऍडमिशनसाठी ६८.५० लाखाचा खर्च येईल असेही म्हणले. त्यानुसार तक्रारदाराने ५ लाखांचा चेक त्यांना दिला. आरोपींनी तक्रारदाराला १६ नोव्हेंबर रोजी कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी या असेही सांगितले. चेक वठल्यानंतर तक्रारदाराने आरोपींना संपर्क केला. तसेच याच दरम्यान तक्रारदाराने सांगलीच्या अश्विनी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्येही विचारणा केल्यावर अशाप्रकारे कोणतेही ऍडमिशन होत नाही आणि सेज ही संस्था खरी नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आम्ही कॉलेजमध्ये समक्ष ऍडमिशन देत असल्याचेही ते म्हणाल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. त्यामुळे तक्रारदाराने पुन्हा सेज अकादमीला संपर्क केला मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. 

मुलीच्या प्रवेशाबाबतही कोणतेही कन्फर्मेशन मिळत नसल्याने तक्रारदाराला शंका आली आणि त्यांनी सेजच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या मुलीप्रमाणे सेज अकॅडमीने अजून आठ जणांकडून अशाच प्रकारे पैसे घेत त्यांना फसवले गेल्याचे तक्रारदाराला समजले. त्यानुसार सर्वांनी याप्रकरणी साकीनाका पोलिसात तक्रार दिली आणि आंग्रे, साकेत, चतुर्वेदी, त्यांचा साथीदार अमित शर्मा आणि इतरांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

जेव्हा केला भाजप नेत्याच्या नावाचा वापर...
काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील ५१ वर्षीय विधवेच्या लेकीला एसएमएमपी (सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ) मेडिकल कॉलेज आणि आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडावे, कुडाळ, सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने ४५ लाख रुपये उकळत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. ज्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुरुवारी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी दावा केला होता की ते सिंधुदुर्गातील एका मोठ्या भाजप नेत्याचे नातेवाईक असून त्या प्रदेशात वैद्यकीय महाविद्यालय चालवणाऱ्या मंडळाचे विश्वस्त आहेत.

Web Title: Fraudulent advertisement for admission for MBBS on Facebook Rs 45 lakhs stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.