Join us

सावधान! ‘हॅलो’ असा आवाज येतो अन् खाते होते रिकामे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 09:48 IST

महिन्यात सेक्सटॉर्शनचे ४९ गुन्हे नोंदविले.

मुंबई : आधी मैत्री करायची. पुढे सावज जाळ्यात अडकताच  आपल्या मधाळ जाळ्यात ओढून अश्लील संवाद व जवळीक साधायची. पुढे हेच व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या टोळीविरोधात गेल्या महिन्यात सेक्सटॉर्शनचे ४९ गुन्हे नोंदविले आहे. 

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या ११ महिन्यांत सायबर संबंधित ३ हजार ८८३ गुन्हे नोंद आहे. त्यापैकी ७०७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये सायबर फसवणुकीच्या २०५७ गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच, सेक्सटॉर्शन संबंधित ४९ गुन्हे नोंद असून, त्यापैकी १२ गुन्ह्यांची उकल करीत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. नुकतेच, दादर परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय तक्रारदार यांना  पूजा नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनीही फक्त फेसबुक वरील सुंदरीचा फोटो बघून ती स्वीकारली. संवाद सुरू झाला. याच ओळखीतून व्हॉटस्ॲपवर अश्लील संवाद सुरू झाला. तिने नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल केला. तक्रारदारालाही तसे होण्यास भाग पाडले. त्यानंतर, पाच मिनिटांतच कॉल कट झाला. दहाव्या मिनिटाला महिलेने अश्लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग शेअर करताच त्यांना धक्का बसला. पुढे नग्न व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत पैसे मागण्यास सुरुवात केली. 

असा लावलात ट्रॅप:

कुठलाही क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला संदेश टाकला जातो. एखाद्याने कुतूहल म्हणून त्याला प्रतिसाद देताच, गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते, मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा, तर कधी पाठविलेल्या न्यूड फोटोंच्या बदल्यात खंडणी मागितली जाते.

अशा वेळी काय काळजी घ्याल ...

 अनोळखी व्यक्तींशी चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती कुणालाही शेअर करू नका. 

 कुणी सतत मेसेज करीत असेल तर त्याला ब्लॉक करा.

 यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईधोकेबाजी