Join us

जादा व्याज देण्याच्या आमिषाने एक कोटी ४० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 05:50 IST

नऊ जणांना घातला गंडा : दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

ठाणे : जादा व्याजाचे आमिष दाखवून नऊ जणांची एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश मोरे (५२, रा. खडकपाडा, कल्याण) आणि संदीप पाटील (४२, रा. वाघबीळ, ठाणे) या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या दोघांचीही रवानगी आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाली आहे.

रेडरॉकगेम, टिप्सझोन अ‍ॅडव्हायजरी प्रा.लि., क्रिप्टो ट्रेड डब्ल्यूएस आणि जिआ कुल आदी बनावट कंपन्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून ठाण्यातील एका रहिवाशाला ११ लाख ५० हजारांची गुंतवूणक करण्यास संदीप पाटील याने भाग पाडले. या गुंतवणूकदारासह नऊ जणांकडून एक कोटी ४० लाख २७ हजार ५०० रुपये गुंतवणुकीसाठी संदीपसह पाच जणांच्या टोळीने घेतले. मात्र, त्यांना योग्य परतावा न करता या भामट्यांनी त्यांची फसवणूक केली.याप्रकरणी २९ मार्च २०१९ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांच्या पथकाने मुख्य आरोपी टीप्स झोन अ‍ॅडव्हायजरी प्रा.लि. या कंपनीचा संचालक प्रकाश मोरे याला कल्याण येथून अटक केली.

संदीपलाही अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ उमंग शाह (वय २७, रा. सुरत, गुजरात) आणि अजय जरीवाला (वय ४३, रा. सुरत, गुजरात) या दोघांना गुजरात येथून ३ एप्रिल रोजी अटक केली. दिल्ली येथून रितेश पटेल (वय ३५, रा. बलसाड, गुजरात) याला ४ एप्रिल रोजी अटक केली. यातील प्रकाश आणि संदीप यांची ८ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.बँक खाती, संपत्तीची चौकशी सुरूउमंग, अजय आणि रितेश या तिघांची १० एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. त्यांची बँकखाती आणि संपत्तीची चौकशी करण्यात येत असून त्यांनी गुजरातसह देशभरात आणखी कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली, याचा तपास करण्यात येत असल्याचीमाहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :गुन्हेगारी