Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतल्या तिवरांच्या जंगलात अजूनही कोल्ह्याचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 07:08 IST

विक्रोळी येथील गोदरेज क्रीक साईड कॉलनी येथे रॉ संघटनेला कोल्हा आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच आता कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशात कोल्ह्याचे वास्तव्य असल्याचे आढळले आहे.

मुंबई  - विक्रोळी येथील गोदरेज क्रीक साईड कॉलनी येथे रॉ संघटनेला कोल्हा आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच आता कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशात कोल्ह्याचे वास्तव्य असल्याचे आढळले आहे.चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशामध्ये वन्य प्राण्यांची जीवसृष्टी असल्यामुळे येथील तिवरांचे प्रदेश वाचविणे गरजेचे आहे. मुंबईमधील तिवरांच्या झाडांची कत्तल होत असून, तिवरांच्या झाडांमध्ये कचरा पडून राहण्याच्या घटना घडत असताना तिवरांच्या प्रदेशात वन्यप्राणी आढळल्याने मुंबईतील वन्यजीवसृष्टी जिवंत असल्याचा दाखला मिळतो, असे पर्यावरणवादी मिली शेट्टी यांनी सांगितले.चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशात अनेक पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यात भर म्हणून आता कोल्ह्याची भर पडली आहे. तिवरांचे प्रदेश कमी करून सिमेंटची जंगले उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, सिमेंटच्या जंगलाला रोखणे आवश्यक आहे. एकमेकांवर आधारलेल्या प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे अन्नसाखळी विस्कळीत होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील तिवरांची काळजी घेऊन संरक्षण व संवर्धन करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील तिवरांच्या प्रदेशातील कोल्ह्यांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. तिवरांच्या प्रदेशात कोल्हा आढळून आल्यामुळे येथील प्रदेशात कोल्हे कशा प्रकारे राहतात, त्यांचे अन्न कोणत्या प्रकारचे आहे, संख्या किती, नर-मादी किती; असा अहवाल प्रशासनाकडून सादर करण्यात येणार आहे.नागरिकांना बिबट्याबद्दल माहिती आहे. त्याचे वास्तव्य कुठे आहे. परंतु कोल्ह्यांबद्दल अशा प्रकारची माहिती नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे, असे रॉ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईवन्यजीव