Join us  

एकाच दिवशी कोरोनाचे चार बळी; राज्याची रुग्णसंख्या ३३५, तर १४ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 2:12 AM

गर्दीमुळे मुंबईतील रूग्णांचा आकडा वाढण्याची भीती आहे. राज्यात बुधवारी ३३ नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले.

मुंबई : राज्यात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचा संसर्ग होऊन चार मृत्यू झाले आहेत. त्यात तीन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय तर दुसरा ५१ वर्षीय आहे. याशिवाय, धारावी, पालघर येथील व्यक्तींच्याही मृत्यूची नोंद आहे. या तिन्ही रुग्णांना परदेशी प्रवासाचा कुठलाही इतिहास नव्हता. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या १४ झाली आहे.

गर्दीमुळे मुंबईतील रूग्णांचा आकडा वाढण्याची भीती आहे. राज्यात बुधवारी ३३ नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यात ३० मुंबईचे, पुण्याचे दोन तर बुलडाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात ७०५ जण विविध रुग्णालयांमध्ये भरती झाले. ७१२६ पैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत ४१ कोरोनाबाधित रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशात ३८६ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ३८६ ने वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे १,६३७ रु ग्ण असून, ३८ मृत्यू झालेले आहेत. मागील २४ तासांत १३२ जण बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले की, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही राष्ट्रीय स्तरावरील वाढ नोंदवत नाही. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत.

जगातील संख्या ९ लाख

नवी दिल्ली : जगातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ४ हजारांवर गेली असून आतापर्यंत या आजाराने ४५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ लाख ५६ हजार जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ९५ टक्के म्हणजे ६ लाख २२ हजार रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे १ लाख, ९० हजार रुग्ण असून आतापर्यंत ४,१०० जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये रुग्णांची संख्या कमी म्हणजे १ लाख, ६ हजार असली तरी मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १२,५०० वर गेला आहे.

स्पेनमध्येही ९ हजार १०० जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. फ्रान्समध्ये ५२ हजारांवर रुग्ण असून तेथे ३,५०० लोक मरण पावले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत ३३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये कोरोनाने ३ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून रुग्णसंख्या ४८ हजार एवढी आहे. ब्रिटनमध्येही २,३५० लोक मृत्युमुखी पडले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई