Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे चार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 02:53 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रो, हेपेटायटिस या रुग्णांची संख्या कमी आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण ओसरले असले तरीही आजार कमी झालेले नाहीत. या महिन्यात साथीच्या आजारांनी शहर उपनगरातील तीन बळी घेतले आहेत. त्यात लेप्टोच्या तीन रुग्णांचा तर स्वाइनच्या एका रुग्णाचा समावेश आहे. याखेरीज एकाच महिन्यात मलेरियाच्या रुग्णांचेही ७६७ रुग्ण आढळल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रो, हेपेटायटिस या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र लेप्टोच्या बळींची संख्या सारखीच आहे. के पश्चिम विभागातील ५८ वर्षीय पुरुष आणि २९ वर्षीय तरुणीचा तर पी साऊथ वॉर्डमधील ४१ वर्षीय व्यक्तीचा लेप्टोने बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे, या महिन्यात डेंग्यूसदृश तापाचे २ हजार ३१७ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांतउपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र यंदा स्वाइन फ्लूचे तब्बल ३६ रुग्ण आढळलेत, तर एकाचा बळी गेला आहे. के दक्षिण विभागातील ६४ वर्षीय पुरुषाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली आहे. लेप्टो आणि स्वाइन फ्लू नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. तरी नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबईमृत्यू