चार विद्यार्थ्यांचे दहावीचे वर्ष वाचले
By Admin | Updated: March 3, 2015 22:36 IST2015-03-03T22:36:26+5:302015-03-03T22:36:26+5:30
परीक्षेस बसण्याची मुभा न दिल्याने पुन्हा बोईसरला परीक्षा केंद्रावर अर्धा तास उशीरा येऊनही परीक्षेला बसण्याची मुभा दिल्याने एस. एस. सी. च्या चार विद्यार्थ्याचे वर्ष वाचले आहे.

चार विद्यार्थ्यांचे दहावीचे वर्ष वाचले
बोईसर : एस.एस.सी.च्या परीक्षेचा नंबर बोईसरला आला असता परीक्षा देण्यास गेले चिंचणीला परंतु चिंचणी केंद्रावर परीक्षेस बसण्याची मुभा न दिल्याने पुन्हा बोईसरला परीक्षा केंद्रावर अर्धा तास उशीरा येऊनही परीक्षेला बसण्याची मुभा दिल्याने एस. एस. सी. च्या चार विद्यार्थ्याचे वर्ष वाचले आहे.
इस्माईल खलीफा, तेजस्वीनी पावडे, प्रफ्फुल किणी व धवल वर्तक या एस. एस. सी. च्या चार विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रीकेवर केंद्र क्रमांकात दुरूस्ती बोईसरच्या सेवा आश्रम विद्यालयातील प्राचार्यांनी केल्यानुसार सदर विद्यार्थी चिंचणी येथील के. डी. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर देण्यासाठी आज सकाळी ११ वा. पोहोचले मात्र तेथील केंद्र संचालकांनी तुमची बैठक व्यवस्था तारापुर एम. आय. डी. सी. मधील टी. व्ही. एम. विद्यालयात असल्याचे सांगून परीक्षेला बसू दिले नाही. गोंधळलेल्या अवस्थेत या चारही विद्यार्थ्यांनी साडे अकराच्या सुमारास तारापूर विद्यामंदिर (टी. व्ही. एम.) गाठून तेथील केंद्र संचालिका जोन रोझारीयो यांना उद्भवलेली समस्या सांगितली तर कागदोपत्री सदर चारही विद्यार्थ्यांचा नंबर टी. व्ही. एम. मध्येच होता .
कासा केंद्रात परीक्षा शांततेत ९७४ विद्यार्थी
कासा : डहाणू तालुक्यातील कासा केंद्रात परिक्षा शांततेत सुरू आहे. इयत्ता १० वी ची परिक्षा मंगळवारपासून सुरू झाली असून कासा केंद्राची परिक्षा आचार्य भिसे विद्यालयात आयोजित केली आहे. तालुक्यातील कासा केंद्रात परिसरातील १५ शाळांचे विद्यार्थी इयत्ता १० वी परिक्षेसाठी दाखल झाले आहेत. कासा केंद्रात एकूण ९७४ विद्यार्थी आहेत.
न्याहाळे : जव्हार तालुक्यात एकुण ३ केंद्रावर मंगळवारी दहावीची परीक्षा सुरू झाली. एकूण १५१८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पहिला दिवस असल्यामुळे पालकही पाल्यांसोबत हजर होते. यंदा हॉल तिकिटाचा कुठलाही गोंधळ झाला नाही. गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटच आलेले नव्हते त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखपत्रांवरून परीक्षेस बसविण्यात आले होते.
पारोळ : वसई तालुक्यामध्ये शालांत परिक्षेचा पहिला पेपर २९ परिक्षाकेंद्रावर सुरळीत पार पडला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. तालुक्याचा विचार करता २९ परिक्षा केंद्रातून मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी व तेलगू या माध्यमाचे २४ हजार विद्यार्थी एस. एस. सी च्या परिक्षेत आपले नशीब आजमावत आहेत.
परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी करावा लागतो तीन तास प्रवास
जव्हार : जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यासाठी जवळपास तीन तास जीवघेणा प्रवास करावा लागत असून रस्त्यामध्ये काही अनुचित घडल्यास (अपघात) त्यास जबाबदार कोण? अशी विचारणा पालकांकडून व्यक्त होत आहे. या कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचा नाव न छापण्याच्या अटीवर मुख्यध्यापकाने सांगितले आहे. जव्हार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जव्हार तालुक्यातील आश्रमशाळेतील जवळपास १५०० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले आहेत.
शासकीय आश्रमशाळा विनवळ, दाभोसा आणि भारती विद्यापीठ जव्हार अशी तीन केंद्र आहेत. तालुक्यातील कानाकोपऱ्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी खाजगी जीपने प्रवास करून नेले जात आहे. त्यामध्ये जव्हारमधील रस्त्यांची दुरावस्था झाली असून प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर नेताना अपघात घडला असता नाहक मुख्याध्यापकाला निलंबित केले होते. मात्र याकडे प्रकल्प कार्यालय जाणुनबुजून जबाबदारी झटकत असल्याचे पालकांकडून बोलले जाते.
या प्रवासादरम्यान अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे. यापूर्वी विनवळ आश्रमशाळा येथे एकमेव केंद्र असताना जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांची भव्य पेंडाल (मंडप) टाकून निवासाची सोय करण्यात आली होती. आता तशी व्यवस्था न करता दररोज विद्यार्थ्यांना पेपरसाठी तीन तीन तास प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अभ्यासावरही परिणाम होतो आहे. या सर्वच बाबींवर मुख्याध्यापकवर्गही नाराज असून गेली वर्षभर केलेल्या खर्चाची बिले अद्याप मिळाली नाहीत. त्यातच आता केलेल्या खाजगी जीप वाहतुकीच्या डिझेलचा खर्च द्यावा लागत आहे.