Join us  

दहिसरच्या आनंदनगरमध्ये चार दुकाने फोडली; आरोपींचे चेहरे सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 6:50 PM

व्यापाऱ्यांमध्ये दहशत 

मुंबई: मुंबई उपनगरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. दहिसरमध्ये गुरुवारी रात्री चार दुकाने फोडण्यात आली. त्यामुळे स्थानीक व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली असुन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दहिसर पुर्वच्या आनंदनगरमध्ये असलेल्या बीएमसी मार्केट परिसरात मध्यरात्री हा प्रकार घडला. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी हरी ओम ड्रायफ्रूट नामक सुक्या मेव्याचे दुकान आहे. त्याचे मालक चुनीलाल चौधरी यांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर सकाळी ते आठच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानाचे शटर तोडल्याचे त्यांनी पाहिले. काही तरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. तेव्हा गल्ल्यातील जवळपास तीन ते चार हजारांची रोकड लंपास करण्यात आली असुन शितपेयाच्या बाटल्या चोर घेऊन पसार झाले असल्याचे त्यांना समजले.

याप्रकरणी त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी जात दुकानातील सीसीटीव्ही केमेरे पडताळून पाहिले. त्यामध्ये दुकानाचे शटर तोडून दोन जण आत शिरत असल्याचे दिसत आहे. तर त्यांचा एखादा साथीदार बाहेर उभा असल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी दुकानातील डिव्हीआर तपासासाठी ताब्यात घेतल्याचे अधिकाऱ्याकडुन सांगण्यात आले. तसेच याच परिसरात दारू, केक आणि औषधांच्या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असुन त्यातही याच टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवड्यात देखील सात ते आठ जण बीएमसी मार्केट परिसरात शिरले होते. मात्र, स्थानिकांनी आरडाओरड केल्याने त्यांनी पळ काढला असे एका स्थानीकाकडून सांगण्यात आले. मात्र  एकंदर या सगळ्या प्रकारामुळे दहिसरच्या व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :गुन्हेगारी