कल्याणमध्ये चार जणांना स्वाइन फ्लू
By Admin | Updated: February 17, 2015 01:52 IST2015-02-17T01:52:58+5:302015-02-17T01:52:58+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत ११ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी चौघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कल्याणमध्ये चार जणांना स्वाइन फ्लू
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत ११ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी चौघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात खासगी रुग्णालयातील एका डॉक्टरचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व रुग्ण खडकपाडा परिसरातील आहेत.
राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना कल्याण शहरातही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मागील आठवड्यात खडकपाडा परिसरात राहणाऱ्या एका ४९वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाली़ तर येथील रहिवासी असलेल्या अन्य एका महिलेचा पंजाबमधील पटियाला येथे मृत्यू झाला. संशयितांपैकी तीन रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप आलेले नाहीत. त्यात एका परिचारिकेचा समावेश आहे. उर्वरित रुग्णांना स्वाइन फ्लू झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर मस्के यांनी ही माहिती दिली. खडकपाडा परिसरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
घाबरून जाऊ नका!
शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना केडीएमसीचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. या आजारावर मुबलक प्रमाणात औषधसाठा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये असून यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.
यंत्रणा तोकडीच
आयुक्त अर्दड यांनी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला असला तरी डॉक्टरांअभावी उपचार करणे शक्य नसल्याची कबुली वैद्यकीय अधिकारी मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपचारासाठी आवश्यक असलेले फिजिशियन नाहीत. त्याचबरोबर डॉक्टरव कर्मचाऱ्यांची ९० पदे सात वर्षांपासून रिक्त आहेत.