चार म्हाडा पदाधिका-यांचे डिपॉझिट गुल
By Admin | Updated: October 23, 2014 02:07 IST2014-10-23T02:07:58+5:302014-10-23T02:07:58+5:30
पक्षश्रेष्ठींच्या मर्जीमुळे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या म्हाडा व विविध महामंडळांतील ६ सभापती व पदाधिकाऱ्यांचे आमदार होण्याचे स्वप्न मतदारांनी धुळीस मिळविले आहे

चार म्हाडा पदाधिका-यांचे डिपॉझिट गुल
जमीर काझी, मुंबई
पक्षश्रेष्ठींच्या मर्जीमुळे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या म्हाडा व विविध महामंडळांतील ६ सभापती व पदाधिकाऱ्यांचे आमदार होण्याचे स्वप्न मतदारांनी धुळीस मिळविले आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या म्हाडाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना नामुष्कीजन्य पराभावाला सामोरे जावे लागले आहे. केवळ दोघांना अनामत रक्कम वाचविता आली आहे.
म्हाडाचे मुंबई, कोकण व मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विभागाचे (आरआर बोर्ड) सभापती तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्ताला आपापल्या मतदारसंघांमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. आता आमदारकी तर दूरच पण आघाडी सत्ता गेल्याने म्हाडातील पदांवरही त्यांना पाणी सोडावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, म्हाडाचे मुंबई मंडळांचे सभापती युसूफ अब्राहनी, कोकण मंडळांचे सभापती माणिक जगताप व सिद्धिविनायक मंदिराच्या न्यास मंडळाचे विश्वस्त प्रवीण नाईक यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर तर मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे व म्हाडाच्या आरआर बोर्डाचे सभापती प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विविध मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. यापैकी अब्राहनी व जगताप यांची डिपॉझिट शाबूत राहिली असून केवळ जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
कॉँग्रेसचा राष्ट्रवादीबरोबर काडीमोड झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाजवादी पार्टीबरोबर आघाडी झाल्याचे जाहीर केले. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना ते विद्यमान आमदार असलेला शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ सोडण्यात आला. मात्र म्हाडाचे सभापती व माजी आमदार युसूफ अब्राहनी यांना याच ठिकाणाहून निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी थेट ‘१० जनपथ’शी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री आघाडी तोडण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात निवडणुकीत आझमी यांनी ४१ हजार ७१९ मते मिळवीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. तर अब्राहनी हे २७ हजार ४१४ मते घेत सेना उमेदवारानंतर तिसऱ्या स्थानी राहिले. पक्षाने अब्राहनी यांचा हट्ट जुमानला नसता तर कदाचित अन्य काही मतदारसंघात अल्प मतांनी पराभव पत्कराव्या लागलेले उमेदवार सपाची मते मिळवून विजयी झाले असते.
कोकण मंडळांचे सभापती माणिक जगताप यांच्या महाडमधील प्रचारासाठी तर दस्तुरखुद्द पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली होती. तरीही त्यांचा शिवसेनेच्या भारत गोगावले यांनी तब्बल २१ हजारांहून अधिक मतांनी धूळ चारली. गोगावले यांना ९४ हजार ४०८ तर जगतापांना ७३ हजार १५२ मते मिळाली.
मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या कॉँग्रेसच्या सुशीबेन शहा व राष्ट्रवादीच्या राणे यांना भाजपाच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडून दारुण पराभव पत्करताना अनामत रक्कम गमाविण्याची नामुष्की लागली. या ठिकाणी झालेल्या एकूण १ लाख ४५ हजार ८२५ मतदानापैकी शहा यांना केवळ १० हजार ९२८ तर राणेंना जेमतेम चार अंकी म्हणजे १ हजार १११ मते पडली. लोढा यांनी तब्बल ९७ हजार ८१८ मते मिळवीत चौथ्यांदा विजय साकार केला. सेनेचे अरुण दुधवडकर यांनी २९ हजारांवर मते घेत दुसरे स्थान पटकावले.
माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करीत असलेल्या प्रसाद लाड यांचा गुरूपेक्षाही दारुण पराभव झाला. सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढविताना त्यांना जेमतेम ११ हजार ७६९ मते मिळाली. त्यांचे डिपॉझिट जप्त करताना भाजपाच्या कॅप्टन सेलविन यांनी ४० हजार ८६९ मते मोठा विजय मिळविला. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे सदस्य असलेल्या प्रवीण नाईक यांनी माहीम मतदारसंघातून नशीब अजमावले. मात्र सेनेचे सदा सरवणकर व मनसेचे नितीन सरदेसाई यांच्यातील तुल्यबळ लढतीमध्ये त्यांना केवळ ११ हजार ९१७ मते मिळाली तर सरवणकर ४६ हजार २९१ मते घेत विजयी झाले.