Join us

चार वेगवेगळ्या इमारत दुर्घटनांमध्ये चार मृत्यू; नागपाडा दुर्घटनेत आजीसह नातीने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 02:46 IST

भायखळा पश्चिम येथील शुक्ला स्ट्रीट मार्गावरील मिश्रा या दोन मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी कोसळला

मुंबई : गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईत काही ठिकाणी इमारतीचा भाग व घरांची पडझड सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात अशा चार वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. यापैकी नागपाडा येथे इमारतीच्या शौचालयाचा भाग कोसळून आजी आणि नातीचा मृत्यू झाला. तर अन्य दोन घटनांमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसरीला किरकोळ दुखापत झाली. तसेच विक्रोळी येथे लिफ्ट कोसळून दोघांचा मृत्यू झाला.

भायखळा पश्चिम येथील शुक्ला स्ट्रीट मार्गावरील मिश्रा या दोन मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी कोसळला. अग्निशमन दलाचे पाच आगीचे बंब, रुग्णवाहिका, पोलीस आणि महापालिका विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत नूर कुरेशी (वय ७०) आणि आलिया कुरेशी (वय १२) या दोघींचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने वेळोवेळी नोटीस दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

सहा वर्षे रखडला इमारतीचा पुनर्विकासइमारत धोकादायक असल्याने तिचा पुनर्विकास केला जाणार होता. मात्र सहा वर्षांनंतरही विकासकाने इमारतीचे बांधकाम सुरू केले नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांना स्थानिक रहिवाशांनी दिली. ही इमारत म्हाडाची असल्याने संबंधित विकासकाविरुद्ध तत्काळ कारवाई करून त्याला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना महापौरांनी या इमारतीच्या पाहणीदरम्यान दिले.

विक्रोळीत लिफ्ट कोसळलीविक्रोळी, कन्नमवारनगर येथे गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास एका इमारतीतील लिफ्ट कोसळून दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र ई. तिवारी (वय ३५), भोलाराम यादव (वय ३६) या दोघांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, चेंबूर पूर्व येथील एका इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून तुळशीबाई अंभोरे (वय ५४) या गंभीर जखमी झाल्या. तर देवनार येथील पडझडीच्या घटनेत एका महिलेला किरकोळ दुखापत झाली.

नागपाडा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदतनागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. शेख यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी निवाºयाची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवडाभरात घेण्याची ग्वाही शेख यांनी यावेळी येथील नागरिकांना दिली. मुख्यमंत्री साहायता निधीमधून नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला केल्याचे शेख यांनी सांगितले.

 

टॅग्स :इमारत दुर्घटना