फोर-जी टॉवर्सचा मुंबईच्या फुफ्फुसालाच धोका

By Admin | Updated: March 14, 2015 23:21 IST2015-03-14T23:21:44+5:302015-03-14T23:21:44+5:30

विरंगुळ्याचे दोन क्षणही स्फूर्तिदायी ठरतात़ पण मुंबईकरांमध्ये एनर्जी भरणारी मोकळी मैदानं, उद्यानांवर फोर जी टॉवरचे अतिक्रमण सुरू झाले आहे़

Four-G towers have the risk of Mumbai's lungs | फोर-जी टॉवर्सचा मुंबईच्या फुफ्फुसालाच धोका

फोर-जी टॉवर्सचा मुंबईच्या फुफ्फुसालाच धोका

मुंबई : मेटाकुटीस आणणारा रोजचा लोकलचा प्रवास, आॅफीसच्या कटकटी आणि न संपणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेत विरंगुळ्याचे दोन क्षणही स्फूर्तिदायी ठरतात़ पण मुंबईकरांमध्ये एनर्जी भरणारी मोकळी मैदानं, उद्यानांवर फोर जी टॉवरचे अतिक्रमण सुरू झाले आहे़ त्यामुळे शहरासाठी फुप्फुसाचे काम करणारी हे मोकळे भूखंड फोर जी टॉवरच्या तावडीतून सोडविण्यासाठी जनआंदोलन पेटू लागले आहे़
मोबाइल फोनने माणसांतीलच नव्हे तर देशांमधील अंतर मिटवून तंत्रज्ञानाच्या युगात क्रांती घडवली़ मात्र टॉवर्स किंवा अ‍ॅन्टिनातून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे मेंदूविकार, कर्करोगासारखे जीवघेणे धोके जाणवू लागल्यावर इमारतींवरील टॉवर्सला विरोध वाढला़ त्यामुळे शैक्षणिक संस्था, रुग्णालय, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाच्या शंभर मीटर परिसरात या टॉवर्सवर बंदी आणण्यात आली़ परंतु मोकळ्या भूखंडांवर फोर जी टॉवर्स उभारण्याची रिलायन्स इन्फोकॉमला परवानगी देऊन पालिकेने मुंबईकरांना धक्काच दिला आहे़
टॉवरमधील किरणोत्सर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मोकळे मैदान, उद्यान, खेळाच्या मैदानात येणारी लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला केवळ यांचेच नव्हे, तर सर्वसामान्य मुंबईकरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे़ त्यामुळे या टॉवरच्या उभारणीविरोधात जनआंदोलन पेटले आहे़ मुलुंड, वांद्रे, चेंबूर, विलेपार्ले येथील स्थानिक रहिवाशांनी आपल्या परिसरातील फोर जी टॉवर उखडून काढण्याची तयारीच केली आहे़

या ठिकाणी
टॉवर्सला परवानगी
मुंबईतील १,१०६ मोकळ्या भूखंडांवर मोबाइल टॉवर उभे राहणार आहेत, याचा सर्वाधिक फटका माटुंगा, सायन या विभागांना बसणार आहे़ या विभागांमधील उद्यानांमध्ये तब्बल ३१ मोबाइल टॉवर्स उभारण्यात येणार आहेत़ मैदान, खेळाचे मैदान, उद्यान, मोकळ्या जागा, रस्ते, पालिकेचे मैदान, वाहनतळ परिसर, पंपिंग स्टेशन या ठिकाणी मोबाइल कंपन्या फोर जी टॉवर उभे करू शकतील़

शिवसेना-भाजपाच्या
कोलांटउड्या
फोर जी टॉवरच्या प्रस्तावाला महापालिकेतून हिरवा कंदील दिल्यानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या नेत्यांनी गळे काढण्यास सुरुवात केली आहे़ चेंबूरच्या उद्यानांमध्ये ११ फोर जी टॉवर बसविणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका आयुक्तांकडे गेल्या महिन्यात केली़ तर भाजपाचे खासदार किरीट सोमैया यांनी मुलुंड येथील पालिका मैदानात टॉवर बसविणाऱ्या ठेकेदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़

येथे पेटले जनआंदोलन
वांद्रे येथील अल्मेडा उद्यानात बसविण्यात आलेला मोबाइल टॉवर काढून टाकण्यास स्थानिक नागरिकांनी भाग पाडले़ मोकळ्या भूखंडांवर ‘किरणोत्सर्गाचा धोका’ ही धोक्याची पाटी पाहणेच धक्कादायक आहे़ त्यामुळे मोबाइल टॉवरच्या धोरणावरच राज्य सरकार फेरविचार करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा वांद्रे येथील काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकारिया यांनी दिला आहे़
विलेपार्ले येथील पालिकेच्या धानजीभाई मैदानात फोर जी टॉवर बसविण्याचा प्रस्ताव आहे़ मात्र या मैदानाच्या नजीकच्या परिसरात तीन शाळा आणि दोन महाविद्यालये आहेत़ त्यामुळे येथे प्रस्तावित टॉवरला विरोध करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी पालिकेला ई मेल, पत्राद्वारे विनंती केली आहे़
मोबाइल टॉवरच्या धोरणावर इंडियन्स फॉर सेफ एन्हायर्नमेंटचे सदस्य प्रकाश मुन्शी यांनी केंद्र व राज्य सरकारकडे दाद मागितली आहे़ सरकारने निश्चित केलेल्या मोबाइल टॉवरमधून किरणोत्सर्गाच्या प्रमाणाबाबतही त्यांनी डिपार्टमेंट आॅफ टेलीकॅम्युनिकेशनकडून स्पष्टीकरण मागविले आहे़
गेल्याच आठवड्यात तज्ज्ञांचे जाहीर चर्चासत्र मुंबईत पार पडले़ यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डॉ़एस़ राधाकृष्णन्, नगर या बिगर शासकीय संस्थेचे विश्वस्त, वास्तुविशारद पीक़े़दास आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुन्शी सहभागी झाले होते़ मात्र या चर्चासत्रात झालेल्या आरोपांचे खंडन करीत मोबाइलच्या अखंड कव्हरेजसाठी टॉवरची आवश्यकता असल्याचे सांगितले़

संशोधन काय म्हणते?
मोबाइल फोन व टॉवरमधून होणारा किरणोत्सर्ग व त्याच्या दुष्परिणामांवर दोन दशकांपासून अभ्यास सुरू आहे़ यावर संधोधन करणाऱ्या काही तज्ज्ञांनी भारतासह १० देशांमध्ये झालेल्या संशोधनाकडे लक्ष वेधले आहे़ बायो इनिशिएटिव्ह २०१२ या अहवालानुसार सततच्या किरणोत्सर्गाच्या सान्निध्यात येणाऱ्यास निद्रानाश, डोकेदुखी, चिडचिड, कामातील एकाग्रता भंग होणे, स्मृतिभ्रंश आणि तणाव असे त्रास संभवतात़
४अर्धांगवायू, गर्भपात, कर्करोग अशा गंभीर आजारांचा धोका घोंघावत असतो़ लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका आहे़
४सलग आठ ते दहा वर्षे अर्धा तास मोबाइल फोनवरून बोलणाऱ्यास मेंदूत गाठ होण्याचा धोका सर्वाधिक असतो, असे मे २०११ मध्ये एका सर्वेक्षणातून उजेडात आले़

किरणोत्सर्गाचे प्रमाण भारतात सर्वाधिक
४सप्टेंबर २०१२ मध्ये भारतात जीएसएम९०० साठी ४५० मिलीव्हॅट प्रति चौ़मी़ व जीएसएम१८०० साठी ९२० मिलीव्हॅट प्रति चौ़मी़ची अनुमती देण्यात आली आहे़ डॉटच्या नवीन नियमावलीनुसार १ आॅगस्ट २०१३ पासून हीच क्षमता थ्री जी व फोर जीसाठी प्रति चौ़मी़ एक हजार मिलीव्हॅट करण्यात आली आहे़
मोकळ्या जागेला मुंबईकर मुकणार
४माणशी १़२४ चौ़मी़ मोकळी जागा उद्यान, मैदानाच्या रूपाने मुंबईकरांना उपलब्ध आहे़ याचे प्रमाण २०३४ पर्यंत दोन करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे़ मात्र फोर जी टॉवरच्या अतिक्रमणानंतर या मोकळ्या जागेलाही मुंबईकर मुकणार आहेत़

किरणोत्सर्गाचा धोका़़़़
इलॅक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड रेडिएशन (ईएमएफ) मायक्रोवेव्ह किंवा वायफायमध्ये एवढीच किरणोत्सर्गाची क्षमता मोबाइलच्या एन्टिनामध्ये असते़ धोका हा टॉवरचा आणि प्रत्येक एन्टिनामधून निघणाऱ्या ऊर्जेचा असतो़ जेवढे एन्टिने आणि ऊर्जा जास्त तेवढेच किरणोत्सर्गाचे प्रमाण अधिक असते़ इमारतीच्या दर्शनी भागात कमाल किरणोत्सर्ग होत असतो़ टॉवर्सपेक्षा एन्टिनांमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा अधिक धोकाअसतो, असे तज्ज्ञांचे मत आहे़

४मानवी शरीरात ७० टक्के पाणी(द्रव) व मेंदूत ९० टक्के द्रव असतो़ त्यामुळे मानवी शरीर किरणोत्सर्ग शोषूण घेत असते़
४ डॉटने जूनमध्ये जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार इलेक्ट्रो मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी ४,५०० वरून ४५० मिली व्हॅट्स प्रति चौ़मी़पर्यंत कमी करण्यात आली आहे़ परंतु तज्ज्ञांच्या मते हे प्रमाणही धोकादायकच आहे़

शेफाली परब-पंडित

Web Title: Four-G towers have the risk of Mumbai's lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.