दुहेरी मार्गासाठी चार विविध प्रस्ताव
By Admin | Updated: February 17, 2015 02:21 IST2015-02-17T02:21:14+5:302015-02-17T02:21:14+5:30
दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना अनेक समस्यांना तोेंड द्यावे लागते. त्यामुळे दुहेरी मार्गाचा प्रश्न सुटावा यासाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्नही केले जात आहेत.

दुहेरी मार्गासाठी चार विविध प्रस्ताव
मुंबई : दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना अनेक समस्यांना तोेंड द्यावे लागते. त्यामुळे दुहेरी मार्गाचा प्रश्न सुटावा यासाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्नही केले जात आहेत. मात्र या दुहेरी मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल चार वेगवेगळे प्रस्ताव मागविण्याची कमाल केली आहे. या दाखल झालेल्या चारपैकी दोन प्रकल्पांवर विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावर एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास दोन्ही रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प होतात. त्यामुळे दुहेरी मार्ग असावा, याची मागणी प्रवाशांकडून केली जात असून, मध्य आणि कोकण रेल्वेकडून तसे प्रयत्नही केले जात आहेत. कोकण रेल्वेचा रोहा ते ठोकूरपर्यंत ७४१ किलोमीटरपर्यंतचा पसारा असून, हा संपूर्ण मार्ग दुहेरीकरण करण्यावर कोकण रेल्वेकडून भर दिला जात आहे. मात्र असे असतानाच रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गासाठी चार वेगवेगळे प्रस्ताव मागविण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रथम रोहा ते करंजाडीपर्यंतचा प्रस्ताव मागविण्यात आला. यात थोडी तांत्रिक कारणे रेल्वे मंत्रालयाकडून दिल्यानंतर वेंदूर ते ठोकूर या टप्प्यातील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव मागविला गेला.
हा प्रस्ताव कोकण रेल्वेने पाठविल्यानंतर रोहा ते ठोकूर असा संपूर्ण ७४१ किलोमीटरचा तिसरा प्रस्तावही कोकण रेल्वेकडून रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला. या तिन्ही प्रस्तावांवर विचार न करता रोहा ते वीर असा ४७ किलोमीटरचा दुहेरी मार्गातील एका छोट्या टप्प्यातला प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाने मागवला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चार प्रस्तावांपैकी आता रेल्वे मंत्रालयाकडून रोहा ते ठोकूर आणि रोहा ते वीर या प्रस्तावांवर विचार केला जात आहे. यातही रोहा ते वीर या अवघ्या ४७ किलोमीटर लांबीच्या दुहेरी मार्गाचाच अंतिम विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)