Join us  

पुरंदरमधून चार कोटींचे एमडी तर ८० कोटींचा कच्चा माल जप्त; एटीएसची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 3:49 AM

ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा

मुंबई : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील दिवे (ता. पुरंदर) येथे गुरुवारी अमली पदार्थ बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून ४.२ कोटींचा मेफेड्रॉन (एमडी) जप्त केला. तर ही पावडर बनविण्यासाठी लागणारे ८० कोटींचे रसायन व अन्य कच्चा मालही जप्त करण्यात आला. त्यातून तब्बल २०० किलो एमडी बनविले जाणार होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एटीएसकडून अमली पदार्थाविरोधात अलीकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई आहे. या कारखान्यातून बनविले जाणारे ड्रग्ज मुंबई व राज्याबाहेर पाठविले जाणार होते. छाप्यावेळी फॅक्टरी बंद असल्याने आरोपी सापडले नाहीत, असे सांगण्यात आले.

एटीएसच्या जुहूतील पथकाने गेल्या वर्षी ६ डिसेंबरला महेंद्र परशुराम पाटील (वय ४९) व संतोष बाळासाहेब अडके (२९) यांना विलेपार्ले येथे अटक करून १४ किलो एमडी व अन्य साहित्य जप्त केले होते. त्याची किंमत ५ कोटी ६० लाख ६० हजार इतकी होती. मुंबई व सासवड या ठिकाणाहून हा माल जप्त केला होता. दोघांकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर अडकेने एमडी पावडर पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधील दिवे येथे असलेल्या श्री अल्फा केमिकल्स या फॅक्टरीत बनवीत असल्याची कबुली दिली. त्यानुसार निरीक्षक दया नायक, साहाय्यक निरीक्षक सागर कुगीर यांच्यासह अन्य सहकाºयांनी तेथे छापा टाकला असता तब्बल १० किलो ५०० ग्रॅम एमडी पावडर सापडली. तसेच १.२ कोटींचे रसायन व कच्चा मालही सापडला. त्यातून तब्बल २०० किलो एमडी पावडर बनविण्यात येणार होती. आंतरराष्टÑीय काळाबाजारात त्याची किंमत जवळपास ८० कोटी इतकी असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. एटीएसचे प्रमुख देवेन भारती, महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, उपायुक्त विक्रम देशमाने, विनयकुमार राठोड व साहाय्यक आयुक्त श्रीपाद काळे आदींच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :गुन्हेगारीअमली पदार्थ