Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुहू चौपाटीवर बुडालेल्या चौघांचेही मृतदेह सापडले; शोधकार्य थांबविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 15:02 IST

जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे फैजल सिकंदर सय्यदचा मृतदेह सापडला

 मुंबई - जुहू येथे समुद्रात बुडालेल्या मित्रांपैकी चौथा मृतदेह काल रात्री उशिरा म्हणजे दिडच्या सुमारास जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे समुद्र किनाऱ्यावर आढळून आला. फैजल सिकंदर सय्यद (वय - १६) याचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलाने सुरु असलेले शोधकार्य थांबविले आहे. 

अंधेरीतील डी. एन. नगरमधील गावदेवी डोंगरावर राहणारे पाच तरुण गुरुवारी (6 जुलै) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान बुडाल्याची घटना समोर आली होती. यामधील वसीम खानला (वय - २२) सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर यामध्ये चौघांचा बूडून मृत्यू झाला आहे. फरदिन सौदागर (वय 17), सोहेल शकील खान (वय -17), फैसल शेख (वय 17), नाझीर गाझी (वय - 17) या तिघांचे मृतदेह काल सापडले होते. तर काल रात्री उशिरा दिडच्या सुमारास  फैजल सिकंदर सय्यद (वय - १६) चा मृतदेह सापडला आहे. मुंबई पोलिस, जीवरक्षक, मुंबई अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदलांच्या जवानांनी बुडालेल्या तरुणांना शोधण्याचे काम हाती घेतले होते. स्पीड बोटी, हॅलिकॉप्टर, डायव्हर्सच्या  मदतीने गुरुवारी सायंकाळपासून सुरू केलेली शोधमोहीम शुक्रवारी उशिरा रात्री थांबविण्यात आले. नौदल आणि तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरद्वारे बचावकार्यात पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे अडथळे येत होते. त्यातच ही बचाव मोहीम पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी हटविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबईपाण्यात बुडणे