Join us  

भाजपाचा स्थापनादिनी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’, रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 7:29 PM

 भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी 6 एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’ होणार आहे. मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी 6 एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’ होणार आहे. मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, या मेळाव्याला राज्याच्या सर्व भागातून खेड्या – पाड्यातून, गावागावातून आणि प्रत्येक शहरातून पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीमुळे समाजाच्या सर्व घटकांमध्ये पक्षाचे स्थान निर्माण झाले असून भाजपा म्हणजेच विकास असे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपाचे केंद्र सरकार आहेच, त्या खेरीज 21 राज्यांमध्ये भाजपाचे स्वतःचे किंवा आघाडीचे सरकार आहे.

त्यांनी सांगितले की, भाजपाच्या राज्य सरकारने सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना चालू आहे. शेतकरी, महिला, युवक, आदिवासी, दलित, ओबीसी अशा सर्व घटकांसाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे भाजपा आज महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. राज्यात सर्वात जास्त खासदार, आमदार, महापौर,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष आणि सरपंच भाजपाचे आहेत.

त्यांनी सांगितले की, भाजपाचे राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य आहेत. पक्ष पदाधिकारी, मोर्चे – आघाड्या यांचे प्रदेश ते मंडल स्तरापर्यंत दोन लाखाहून अधिक पदाधिकारी आहेत. बूथरचनेचे काम यशस्वी झाले असून राज्यातील 92 हजार बूथपैकी 83 हजार बूथमध्ये ‘वन बूथ 25 यूथ’ ही मोहीम यशस्वी झाली आहे. बाकी बूथमध्ये काम चालू आहे. पक्षाच्या निवडणुकीतील यशानंतर आणि प्रचंड विस्तारानंतर स्थापना दिनी ६ एप्रिलला मुंबईत राज्यभरातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

ते म्हणाले की, मुंबईतील 6 एप्रिलच्या महामेळाव्यापूर्वी राज्यभर भाजपा कार्यकर्ते 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत ‘बूथ चलो अभियान’ राबविणार आहेत. या काळात प्रत्येक बूथ प्रमुख व पेजप्रमुखाच्या घरावर भाजपाचे झेंडे लावण्यात येतील, बूथमधील कार्यकर्ते व नागरिकांच्या बैठका आयोजित करण्यात येतील तसेच खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांना भाजपा सरकारच्या विकासकामांची माहिती देतील. याचप्रमाणे बूथमधील एका ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने पक्षातर्फे स्वच्छता अभियान करण्यात येईल.  

यावेळी पत्रकार परिषदेस प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, सचिव सुरेश शाह, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये व गणेश हाके उपस्थित होते.

टॅग्स :रावसाहेब दानवेभाजपामुंबई