Join us  

विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन, निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व हरपले - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 12:35 PM

विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई - विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणालेत की, प्रा. फरांदे हे एक ध्येयवादी अध्यापक, चिंतनशील अभ्यासक, अभ्यासू वक्ते आणि चौफेर प्रतिभेचे साहित्यिक होते. सामाजिक बांधिलकीपोटी ते राजकारणात सक्रीय झाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभर फिरून पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. अगदी शेवटच्या स्तरावरील कार्यकर्त्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

प्राध्यापकांच्या संघटनांसह विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांत सक्रीय योगदान देतानाच प्रा. फरांदे यांनी कृषी, सहकार आणि जलसंधारण क्षेत्रात मोलाचे कार्य केले. विशेषत: कृषी विद्यापीठाचे काम अधिकाधिक शेतकरीभिमुख करण्यासाठी त्यांनी जाणीवेने प्रयत्न केले. विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात प्रारंभी सदस्य, पक्षाचे उपनेते, उपसभापती आणि सभापती पद भूषविताना आपल्या विनयशील कार्यपद्धतीने ते साऱ्यांच्याच आदरास पात्र ठरले होते.

पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

विधान परिषदेचे माजी सभापती  ना. स. फरांदे यांचे मंगळवारी (16 जानेवारी) निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला होता. यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

ना.स. फरांदे यांचा राजकीय प्रवासमूळचे सातारा जिल्ह्यातील अोझरडे येथील असलेले फरांदे यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. सुरूवातीला त्यांनी धुळे व नंतर नगर जिल्हयातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कोपरगावला प्राध्यापक असताना ते राजकारणात आले. नगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रं सांभाळली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली. त्यांनी नगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात अपयश आले. 

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीस