Join us  

NSDचे माजी संचालक इब्राहिम अल्काझी यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 11:09 PM

शालेय शिक्षण मराठीत झाले. मग मुंबईत सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये पुढचे शिक्षण झाले. सेंट झेवियर्स कॉलेजात शिकत असल्यापासून इब्राहिम अल्काझींचे लक्ष नाटकात होते. १९४८ साली त्यांनी ‘हॅम्लेट’ नाटकात काम केले होते.

मुंबई - नाट्य क्षेत्रातले दिग्गज कलाकार इब्राहिम अल्काझी यांचं निधन झालं. स्वातंत्र्योत्तर भारतात कलेचा पाया उभा करणाऱ्या मोजक्या मंडळीतील एक व्यक्ती म्हणजे इब्राहिम अल्काझी होते. १८ ऑक्टोबर १९२५ पुणे येथे त्यांचा जन्म झाला. उत्तम मार्गदर्शक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून इब्राहिम अल्काझी जगभर नावाजलेले होते. वडील सौदीतले गर्भश्रीमंत व्यक्ती होते, तर आई कुवैती होत्या. इब्राहिम म्हटलं की ते मुसलमानच असणार हा समज होतो. पण ते मूळचे पारसी होते. घरचा मसाल्याच्या पदार्थांचा व्यवसाय होता.

शालेय शिक्षण मराठीत झाले. मग मुंबईत सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये पुढचे शिक्षण झाले. सेंट झेवियर्स कॉलेजात शिकत असल्यापासून इब्राहिम अल्काझींचे लक्ष नाटकात होते. १९४८ साली त्यांनी ‘हॅम्लेट’ नाटकात काम केले होते. नंतर इब्राहिम अल्काझी बीएचा अभ्यास पूर्ण करून रॉयल एकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट (म्हणजे RADA) या अग्रगण्य संस्थेमधे रंगभूमी विषयक रीतसर अव्वल शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. इब्राहिम अल्काझी हे लंडनला असताना चित्र काढत असत आणि त्यांचा चित्रकलेचा अभ्यास गाढा होता. त्या काळात पाहिलेल्या युरोपियन नाटकांचा इब्राहिम अल्काझींच्या मनावर प्रगाढ परिणाम झाला. त्यातली बरीचशी नाटके भारतात आल्यावर त्यांनी बसविली. ते भारतात आल्यावर त्यांच्या सारख्या तज्ज्ञ माणसाला भारत सरकारने त्यावेळी भारतीय रंगभूमीविषयक काहीतरी ठोस करण्यासाठी प्रात्साहन दिलं, अधिकार दिला. त्यांच्यामुळेच दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’सारखी अग्रगण्य शिक्षणसंस्था उभी राहिली. ‘‘विठ्ठलराव दीक्षित व मामा वरेरकर हे दोघे इब्राहिम अल्काझी यांच्या कारकीर्दीतले दीपस्तंभ होत.अल्काझी सांगत असत, मामा वरेरकर यांनीच नभोवाणी खात्याचे सचिव अरफाक हुसेन यांना सांगून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी रीतसर अभ्यासक्रम तयार करण्याचे काम मला देवविले. त्यातूनच स्कूलच्या प्राचार्यपदावर माझी नेमणूक झाली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेत इब्राहिम अल्काझी यांनी सर्वदृष्टय़ा क्रांती करण्याचा प्रयत्न केला. भारतात नाट्यकला शिक्षण आधुनिक काळात प्रायोगिक रूपात रुजवण्यामध्ये अल्काझींचे महत्त्वपूर्ण योगदान होते. भारतीय नाटकांच्या बरोबरच इब्राहिम अल्काझींनी ग्रीक शोकांतिका, ऑस्बर्न, इब्सेन, चेकॉव्ह, बेकेट, ब्रेशश्ट, मोलियर, स्ट्रिंगबर्ग यांची नाटके, आणि शेक्सपियरची मुख्य नाटके विद्यार्थ्यांकडून बसवून घेऊन, दिल्लीत त्यांचे रंगमंचीय अनेक प्रयोग केले. इब्राहिम काझींमुळे दिल्लीत जपानी ’काबुक’ या नाट्यप्रकाराचेही प्रयोग झाले. अशा प्रकारे, इब्राहिम अल्काझींनी भारतात राष्ट्रीय नाट्याची संकल्पना अमलात आणली आणि पुढे रुजवलीही. विजय तेंडुलकर, बादल सरकार, गिरीश कार्नाड आणि मोहन राकेश यांची नाटके इब्राहिम अल्काझी यांनी बसविली. कित्येक पाश्चात्त्य नाटके हिंदीत बसविली आणि वेगवेगळ्या विभागीय शैलीतील प्रयोग रंगमंचावर आणले. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे खुल्या रंगमंचावर नाट्यप्रयोग करण्याची सुरुवात इब्राहिम अल्काझींनी केली. पुराना किल्ला आणि असेच खुले पटांगण असलेल्या ऐतिहासिक व अन्य इमारतींत अल्काझींचे नाट्यप्रयोग होत असत. अशा प्रकारे झालेल्या नाटकांमध्ये ‘तुघलक’ व ‘अंधायुग’ या नाटकांचे प्रयोग कायमस्वरूपी लक्षात राहणारे ठरले.

इब्राहिम अल्काझींच्या शिष्यांत ओम शिवपुरी, नसीरुद्दीन शाह, मनोहर सिंग, ओम पुरी, पंकज कपूर असे अनेक कलावंत आढळतात. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकलेल्या महाराष्ट्रीयांच्यात कमलाकर सोनटक्के, सई परांजपे, शशिकांत निकते, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, वामन केंद्रे, जयदेव हट्टंगडी, ज्योती सुभाष, अमृता सुभाष, उत्तरा बावकर, अशी अनेक नावे आहेत. या सर्वावर अल्काझींच्या शिकवणीचा गाढ ठसा उमटलेला असूनही त्या- त्या कलावंताची स्वतंत्र अस्मिता जागी दिसते. हमीद सयानी (अमिन सयानी यांचे ज्येष्ठ बंधू) हे इब्राहिम अल्काझींचे साडू. अल्काझींची पत्नी या अॅलेक पदमसी यांच्या भगिनी होत. मुंबईत त्याकाळी ‘थिएटर ग्रुप’ नावाची एक हौशी नटांची संस्था होती. त्यांची नाटके इंग्रजीत असत. त्यात इब्राहिम अल्काझींची पत्नी रोशन हिच्याबरोबर तिचे बंधू अॅलेक पदमसी व इतर भावंडे असत. पुढे ग्रुपमध्ये फूट पडली आणि इब्राहिम अल्काझी लंडनहून परतल्यावर त्यांनी व निस्झी इझिकेल इत्यादींनी १९५४ मध्ये मुंबईत ’थिएटर युनिट’ नावाची संस्था स्थापन केली, आणि इथे त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरीला सुरुवात झाली. या संस्थेच्या वतीने त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्रजी नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग केले. अल्काझी हे जसे अभिनेते होते तसेच ते चित्रकार होते आणि त्यांचा चित्रकलेचा अभ्यास गाढा होता. मुंबईला असताना त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत आधुनिक चित्रकलेवर आधारलेली १३ प्रदर्शने भरविली होती. काही प्रदर्शनांत मूळची अस्सल चित्रे होती. त्यात पिकासोची काही दुर्मीळ चित्रे होती.इब्राहिम अल्काझी यांनी विविध चित्रकारांच्या ४० हजार स्लाइड्स सांभाळल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मुंबईत इब्राहिम अल्काझींनी ‘मेक्सिकोचे भित्ती चित्रकार’ या विषयावर स्लाइड्ससह व्याख्याने दिली होती. एम एफ हुसेन यांच्या वर त्यांनी लिहिलेले छोटे पुस्तक लिहिले होते. नाटकाइतकेच चित्र-शिल्पकलेतही इब्राहिम अल्काझी पारंगत होते. इब्राहीम अल्काझी यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक नाटक अकॅडमी, तन्वीर सन्मान यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विजया मेहता एका मुलाखतीत म्हणतात, इब्राहिम अल्काझींची भेट हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॊइन्ट ठरला. 'अल्काझी नसते तर तर मी नटी म्हणूनच वावरले असते, दिग्दर्शक झाले नसते ' नंतरच्या काळात त्यांनी केलेलं नाट्य दिग्दर्शन, तालमी मधील वातावरण, नटाशी वागायची पद्धत, शिस्त या सगळ्याचवर इब्राहीम अल्काझींचा मोठा प्रभाव राहिला. नाटक हा एक सृजनशील धर्म आहे ही शिकवण अल्काझींकडूनच मिळाली. मध्यंतरी इब्राहिम अल्काझी यांच्या नाट्य कारकिर्दीचा  'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट' मध्ये भरले होते.

टॅग्स :मृत्यूमुंबई