माजी मंत्र्यांना घरचा रस्ता!
By Admin | Updated: October 20, 2014 03:22 IST2014-10-20T03:22:45+5:302014-10-20T03:22:45+5:30
महानगरातील मतदार राजाने निवडणुकीत भल्याभल्यांना घरी बसविले असून त्यामध्ये दोन माजी मंत्री व विरोधी पक्षातील दोन गटनेत्यांना पराभवाचा धक्का दिला आहे

माजी मंत्र्यांना घरचा रस्ता!
मुंबई : महानगरातील मतदार राजाने निवडणुकीत भल्याभल्यांना घरी बसविले असून त्यामध्ये दोन माजी मंत्री व विरोधी पक्षातील दोन गटनेत्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. त्याशिवाय पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता, महत्त्वाचा नेता, कारभारी अशी महत्त्वाची पदे सांभाळणाऱ्यांना जनतेने नाकारले आहे. या निवडणुकीमध्ये केवळ कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे नव्हे शिवसेना,भाजपाच्या महत्त्वपूर्ण नेत्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘किचन कॅबिनेट’मधील समजल्या जाणारे गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रविण दरेकर व शिशीर शिंदे यांना मतदारांनी झिडकारले आहे. नांदगावकरांना लोकसभेप्रमाणेच यावेळी सेनेकडून नामुष्कीजनक म्हणजे तब्बल ४१ हजारांवर मतांनी पराभव स्वीकारावा लागला. दरेकरांना २० तर सरदेसाई व शिंदे यांची ५ हजारांनी हार झाली. दोन वेळा आमदार राहिलेल्या कॉँग्रेसच्या अॅनी शेखर यांना मतदारांनी घरी बसविले आहे. तर चेंबूरमधून माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे, दिंडोशीतून राजहंस सिंह, कलिन्यातून कृपाशंकर सिंह, सायनमधून जगन्नाथ शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याचप्रमाणे कुर्ल्यातून राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे, भाजपातून निवडणूक लढविलेल्या विजय कांबळे यांना पराभव पत्करावा लागला. तर शिवसेनेच्या सुभाष देसाई यांना गोरेगावमधून हार पत्करावी लागली.