Join us  

माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 9:10 PM

Hussein Dalwai News: काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहीलेले माजी राज्य न्याय मंत्री, माजी लोकसभा व राज्यसभा खासदार आणि खेडचे माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई यांचे मुंबई येथे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

चिपळूण - काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहीलेले माजी राज्य न्याय मंत्री, माजी लोकसभा व राज्यसभा खासदार आणि खेडचे माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई यांचे मुंबई येथे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यू समयी ९९ वर्षांचे होते. एका समाजवादी व काँग्रेसी विचारांच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 चिपळूण शहरालगतच्या मिरजोळी गावचे ते रहिवासी होते. शहरातील युनायटेड हायस्कूल मध्ये त्यांची एसएससी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यापुढील महाविद्यालयीन मंबई येथे घेतले. त्यांनी कायद्याची पदवीही घेतली होती. त्यापुढे त्यांनी काही वर्षे मुंबई हायकोर्टात वकिली देखील केली. नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली व आमदार म्हणून काम केले. याच काळात राज्यात त्यांनी न्यायमंत्री म्हणून काम पाहिले. केंद्रामध्ये राज्यसभेवर ते खासदार म्हणून दोनवेळा निवडून गेले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून लोटे येथील औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी देखील त्यांनी परिश्रम घेतले होते. राज्यमंत्री मंडळात काम करताना मंत्रालयातील त्यांचे कार्यालय आणि त्यांचे निवासस्थान कोकणातील लोकांना आपले हक्काचे घर वाटायचे. कोणताही धर्म, जात पात व राजकीय पक्ष न पाहता त्यांनी लोकांची कामे करण्यावर भर दिला होता. डॉ. तात्या नातू व हुसेन दलवाई यांच्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीत ते २५ हजार मतांनी विजयी झाले होते. खिलाडू वृत्तीने राजकीय निवडणूक कशी लढवावी हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिले होते.

सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून त्यांनी समाजवाद जोपासला आणि काँग्रेस विचारांशी ते एकनिष्ठ राहीले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोकणात अनेक विकास कामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. एक ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, व १ मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. निधनाचे वृत्त चिपळूण परिसरात समजताच अनेकांनी श्रद्धांजली वाहीली.

टॅग्स :रत्नागिरीमुंबई