माजी महापौर निर्मला सावळे अखेर सेनेत
By Admin | Updated: April 26, 2017 00:14 IST2017-04-26T00:14:22+5:302017-04-26T00:14:22+5:30
शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असलेले परंतु भाजपाने त्यांची इच्छा नसतानाही पक्षात प्रवेश केल्याने प्रकाशझोतात आलेले

माजी महापौर निर्मला सावळे अखेर सेनेत
भार्इंदर : शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असलेले परंतु भाजपाने त्यांची इच्छा नसतानाही पक्षात प्रवेश केल्याने प्रकाशझोतात आलेले राष्ट्रवादी नगरसेवक कमलेश भोईर यांच्यासह माजी महापौर निर्मला सावळे-कांबळे यांनी अखेर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
पक्षांतरासाठी सेनेतील स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असलेले भोईर यांनी भाजपातच प्रवेश केल्याचा आततायीपणा भाजपाने केला होता. इच्छा नसतानाही आ. नरेंद्र मेहता यांनी पक्षात प्रवेश केल्याच्या घोषणेवर भोईर यांनी आगपाखड केल्यानंतर शहरात पक्षांतराच्या चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगले. भोईर सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती असतानाही मेहता यांनी त्यांचा भाजपात प्रवेश झाल्याचा उपद्व्याप केला. मेहता यांच्या या संतापजनक व्यवहारावर सेनेने तीव्र भावना व्यक्त केली. भोईर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात मंगळवारी मातोश्री गाठली. त्यावेळी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी नगरसेविका व माजी महापौर निर्मला सावळे-कांबळे यांनीही मातोश्रीवर जाऊन सेनेत प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी सेनेत आले.
खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख धनेश पाटील, उपशहरप्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक संदीप पाटील, हरिश्चंद्र आमगावकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)