Join us  

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या माजी व्यवस्थापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:47 AM

कापड बाजार आणि दुकाने मंडळ, मुंबई हे माथाडी कामगार यांचे कामाचे व वेतनाचे नियोजन करणारे मंडळ आहे.

मुंबई : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या साकीनाका शाखेत कापड बाजार आणि दुकाने मंडळातील कामगारांच्या असलेल्या ५ कोटींच्या ठेवींवर बँकेच्या माजी व्यवस्थापकाने डल्ला मारल्याचे समोर आले. त्रिभुवनसिंग यादव असे त्याचे नाव असून या प्रकरणी यादवसह सराईत गुन्हेगार वाहिद पटेल यालाही पोलिसांनीअटक केली आहे.

कापड बाजार आणि दुकाने मंडळ, मुंबई हे माथाडी कामगार यांचे कामाचे व वेतनाचे नियोजन करणारे मंडळ आहे. या मंडळामार्फत कामगारांना वेतन अदा करण्यात येते. तसेच त्यांच्या लेव्हीच्या रकमा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात येतात. त्यापैकी २३ मार्च २०१८ रोजी मंडळामार्फत ५ कोटी रुपयांची मुदत ठेव इंडियन ओव्हरसीज बँकेत ठेवण्यात आली.

त्याचदरम्यान २४ आॅक्टोबर रोजी मंडळाने नमूद ठेवींबाबत चौकशी केली असता, २० एप्रिल २०१८ रोजी मुदत संपण्यापूर्वीच या ठेवी रद्द झाल्याचे मंडळाला सांगितले. नमूद ५ कोटी १ लाख ३१ हजार ५०६ रुपये बँकेकडून डीडीद्वारे भांडुपच्या शाखेत जमा केल्याचे समजले. त्यानुसार, अध्यक्ष दिनेश सांडू दाभाडे यांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अपर पोलीस आयुक्त मनोज शर्मा, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, साहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक बुधन सावंत, सपोनि पाडवी, पोउनि ढवण आणि जागडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशीत बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक यादव याने पटेलच्या संगनमताने पैशांवर हात साफ केल्याचे समोर आले. त्यानुसार, यादवला बेड्या ठोकण्यात आल्या. पटेल हा अभिलेखावरील आरोपी असून, तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा घेत केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी या पैशांचे काय केले, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :अटकबँकपोलिस