Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी विभागप्रमुखांना आरोपी करा; सत्र न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 07:56 IST

तडवीच्या आत्महत्येस जबाबदार ठरल्याचा तसेच जातीयवादी छळाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप चियांग यांच्यावर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटलमधील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग चियांग यांना डॉ. पायल तडवीच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिले. तडवीच्या आत्महत्येस जबाबदार ठरल्याचा तसेच जातीयवादी छळाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप चियांग यांच्यावर करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने डॉ. चियांग यांच्यावर आरोप निश्चित करण्याची सरकारी वकिलांची विनंती मान्य केली. तडवी आणि तिच्या कुटुंबीयांनी या छळाविरोधात अनेकदा तक्रार करूनही डॉ. चियांग यांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे आरोपींना छळ करण्यास एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. 

न्यायालयाचे निरीक्षण

विशेष न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी सरकारी वकिलांच्या अर्जाला मंजुरी देताना निरीक्षण नोंदविले की, प्राथमिक पुराव्यावरून तडवी व तिच्या नातेवाइकांनी छळाच्या तक्रारी घेऊन डॉ. चियांग यांच्याकडे संपर्क साधला होता. डॉ. चियांग यांनी रॅगिंग आणि गैरवर्तनाची तक्रार महाविद्यालय प्रशासनाला तोंडी वा लेखी स्वरूपात केली नाही. त्यामुळे  चियांग यांनी  कर्तव्याकडे दुर्लक्ष केले.

 

टॅग्स :न्यायालय