माजी नगरसेवकांत ‘कहीं खुशी कहीं गम’, साेडतीमध्ये ५० वॉर्डांतील आरक्षणात बदल; पुनर्वसनासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ
By जयंत होवाळ | Updated: November 12, 2025 13:18 IST2025-11-12T13:13:34+5:302025-11-12T13:18:01+5:30
Mumbai News: मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रभाग आरक्षण मंगळवारी जाहीर झाले असून ५० वॉर्डातील आरक्षणात बदल झाले आहेत. पालिकेच्या २२७ जागांपैकी अनुसूचित जमाती २, अनुसूचित जाती १५, ओबीसी ६१ आणि सर्वसाधारण गटातील महिलांच्या ७४ जागांसाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत पार पडली.

माजी नगरसेवकांत ‘कहीं खुशी कहीं गम’, साेडतीमध्ये ५० वॉर्डांतील आरक्षणात बदल; पुनर्वसनासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ
- जयंत हाेवाळ
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रभाग आरक्षण मंगळवारी जाहीर झाले असून ५० वॉर्डातील आरक्षणात बदल झाले आहेत. पालिकेच्या २२७ जागांपैकी अनुसूचित जमाती २, अनुसूचित जाती १५, ओबीसी ६१ आणि सर्वसाधारण गटातील महिलांच्या ७४ जागांसाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण बदलाचा काही ज्येष्ठ नगरसेवकांना फटका बसला, तर काहीजण आरक्षणाच्या फेऱ्यातून बचावले. एकूण ५० वॉर्डातील आरक्षणात बदल झाल्याने तेथील माजी नगरसेवकांनी पुनर्वसनासाठी अन्य वॉर्डात प्रयत्नही सुरू केले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सोडतीला सुरुवात झाली. माजी ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा, रिद्धी फुरसुंगे, शुभदा गूढेकर, भाजप आमदार आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती अळवणी, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील, स्नेहल आंबेकर, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता, माजी महापौर विशाखा राऊत, विधि समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत रहाटे, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर, नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक, विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर यांना आरक्षण बदलाची झळ बसली आहे. या महत्त्वाच्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
किशोरी पेडणेकर यांना दिलासा
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वॉर्डाचे आरक्षण बदलणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांच्या वॉर्डाचे आरक्षण बदललेले नाही. त्यावर पहिला टप्पा जिंकला आहे, आता पक्ष जे निर्देश देईल त्याचे पालन होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ज्योती अळवणी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय २०१७ सालीच घेतला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढवली होती. यंदा आरक्षण लागू झाल्याने निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे पराग आळवणी म्हणाले. नील सोमय्या यांनी २०१७ साली सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवली होती. यंदा त्यांचा वॉर्ड नागरिकांचा मागासवर्गीय (महिला) झाला आहे.
आशिष चेंबूरकर यांनाही फटका
उद्धवसेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांचा वॉर्ड सर्वसाधारण (महिला) झाला आहे. राष्ट्रवादीच्या ज्योती हारून खान यांचा १२४ क्रमांकाचा वॉर्डही सर्वसाधारण महिला असा राहिला आहे. राष्ट्रवादीच्या पालिकेतील माजी गटनेत्या राखी जाधव यांनी महिला सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवली होती. यंदा त्यांचा वॉर्ड सर्वसाधारण (महिला) झाला आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांचा १६६ क्रमांकाचा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गात कायम राहिला आहे. ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचा १९६ क्रमांकाचा वॉर्ड सर्वसाधारणऐवजी सर्वसाधारण महिला झाला आहे.
रवी राजा यांचे काय?
रवी राजा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. पालिकेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता भाजपला त्यांची अन्य वॉर्डात सोय लावणे क्रमप्राप्त ठरेल, असे दिसते. मात्र, त्यातही अडचण आहे. एफ-उत्तर वॉर्डात १० प्रभाग आहेत, त्यापैकी ८ प्रभागांत महिला आरक्षण लागू झाले आहे, तर उर्वरित दोन प्रभाग वडाळा मतदारसंघात आहेत. यासंदर्भात रवी राजा म्हणाले, माझ्या प्रभागात आरक्षण लागू झाले असले तरी पक्षाचे काम करत राहू.
महिलांसाठी एकूण ११४ जागा : विविध आरक्षित गट आणि सर्वसाधारण गटात महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने एकूण ११४ जागांवर महिलांना निवडणूक लढविता येणार आहे. त्याशिवाय सर्वसाधारण खुल्या गटातूनही महिलांना निवडणूक लढविता येईल.