Join us  

नया है वह! मंत्री झाल्याने शहाणपण येतं असं नाही; देवेंद्र फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 4:57 PM

आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: आम्ही फोन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि जिल्हा निहाय बैठकांद्वारे लोकांची मदत कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करत असून विरोधी पक्षातील काही मंडळी ही हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना ते मंत्री करु शकतात. पण मंत्री झाल्याने शहाणपण येतच असं नाही, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. तसेच 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला देखील लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात ज्या दिशेने कोरोनाबाबत आपण जात आहोत, ती परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील 46 टक्के मृतांचा आकडा आपल्या राज्यात आहेत. अनेक मृत्युंची नोंद केली नाही आहे. 600 जणांचा मृत्यू अजूनही अपलोड केलेले नाहीत. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या केल्या जात आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

तत्पूर्वी, सध्या आमचा भर नागरिकांना फिट ठेवण्यावर आहे. विरोधी पक्ष मात्र इथल्या ‘हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजम’मध्ये व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली होती. एमएमआर रिजनमधील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आदित्य ठाकरे यांनी कल्याण मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.

देवेंद्र फडणवीसांचा राज्यभर दौरा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर दौरे करून आरोग्य यंत्रणातील त्रुटीवर बोट ठेवत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विराेधी पक्षात यामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सध्या तरी दिसत आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपा