आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक रमले शाळेच्या जुन्या आठवणींत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:36 IST2020-02-25T00:36:38+5:302020-02-25T00:36:40+5:30
कीर्ती महाविद्यालयात संमेलन: ७८८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक रमले शाळेच्या जुन्या आठवणींत
मुंबई : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांसह माजी प्राध्यापकांनीही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली होती.
महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. १९६० ते २०१९ पर्यंतच्या कीर्ती महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून सार्वजनिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले ७८८ विद्यार्थी सोहळ्याला उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. पवार आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष नील हेळेकर यावेळी उपस्थित होते. याच महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून दाखल झालेले डी.व्ही. पवार सध्या महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवित असल्याने त्यांचे विशेष कौतुक होत होते.
संमेलनाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या माजी प्राध्यापकांमुळे कार्यक्रमाला रंगत आली. उपस्थित माजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमुळे त्या-त्या बॅचच्या आठवणींना उजाळा मिळाला. अनेकांनी आपापल्या विभागात आणि वर्गात सेल्फी, फोटो काढत, एकप्रकारे आपापल्या जुन्या आठवणींना जिवंत केले. त्यांचा संयुक्तपणे विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला.
एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या सोहळ्यासाठी विशेष तयारी केली होती. कला, वाणिज्य, विज्ञान आणि बीएमएमसह सर्व विभागांच्या आजी विद्यार्थी आपल्याला सीनिअर असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सरबराईत व्यस्त होते. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडेपर्यंत आजी विद्यार्थ्यी आनंदाने कार्यरत होते.