बेलापूर रुग्णालयास पोलीस छावणीचे स्वरूप

By Admin | Updated: August 13, 2014 01:42 IST2014-08-13T01:42:43+5:302014-08-13T01:42:43+5:30

बेलापूरमध्ये पालिकेने बांधलेल्या रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. सोमवारी नेरूळमध्ये काँगे्रस कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केल्यामुळे सदर ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Format of police camp for Belapur hospital | बेलापूर रुग्णालयास पोलीस छावणीचे स्वरूप

बेलापूर रुग्णालयास पोलीस छावणीचे स्वरूप

नवी मुंबई : बेलापूरमध्ये पालिकेने बांधलेल्या रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. सोमवारी नेरूळमध्ये काँगे्रस कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केल्यामुळे सदर ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बेलापूरमधील जिल्हा परिषदकालीन आरोग्य केंद्राच्या जागेवर महापालिकेने ५० बेडचे रुग्णालय उभारले आहे. त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु कर्मचारी भरती व इतर कारणांनी रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. सोमवारी नेरूळ रुग्णालयातही बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. तेथे काँगे्रसने तीव्र आंदोलन केले होते. हा विरोध लक्षात घेवून पोलिसांनी बेलापूरमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांची चौकशी पोलिसांकडून केली जात होती. यावेळी सहायक पोलीस आयुक्त, उपआयुक्त आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेलापूर येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयामुळे नागरिकांना कमी दरामध्ये उपचार उपलब्ध होतील. तसेच सध्या याठिकाणी दुसरे मनपा रुग्णालय नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. यामुळे याठिकाणी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. तसेच या रुग्णालयामध्ये चतुर्थश्रेणीमध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
या वेळी आमदार गणपत गायकवाड, महापौर सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक, उपमहापौर अशोक गावडे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, कार्यक्रमाचे निमंत्रक तथा आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार, उपसभापती शिल्पा मोरे, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक अमित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Format of police camp for Belapur hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.