तालुक्यातील जंगले वणव्यांनी खाक
By Admin | Updated: May 11, 2015 01:28 IST2015-05-11T01:28:35+5:302015-05-11T01:28:35+5:30
शहापूर हिरव्यागार वनांनी बहरलेला तालुका. मात्र, सततच्या वणव्यांनी सारी हिरवाई नाहीशी होत आहे.

तालुक्यातील जंगले वणव्यांनी खाक
शहापूर हिरव्यागार वनांनी बहरलेला तालुका. मात्र, सततच्या वणव्यांनी सारी हिरवाई नाहीशी होत आहे. जंगलमाफियांकडून हे प्रकार सुरू असताना केवळ गुन्हे दाखल करण्याव्यतिरिक्त वन विभाग दुसरी कोणतीही कारवाई करत नाही.
भातसा, तानसा, वैतरणा यासारखी जलाशये, यांच्या चहूबाजूला असलेली दाट जंगले, दुर्मीळ वनौषधी हे शहापूर तालुक्याचे बलस्थान असतांना वणव्यांनी सारी वनराई नष्ट होत आहे. शिकारीच्या हव्यासाने, जमिनीची मोजणी करता यावी यासाठी किंवा वनजमिनीत कुणी शेतीसाठी मशागत करून मालकी दाखवू नये, यासाठी जंगलमाफियांकडून वणवे लावले जात आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये तालुक्यातील जंगलांच्या प्रमाणात झपाट्याने घट झाली आहे. यात भातसानगर, तानसा, वैतरणा, आगई, डोळखांब, किन्हवली, नडगाव या वनक्षेत्रांचा समावेश आहे. दरम्यान, वणव्यांना रोखण्यासाठी वन व्यवस्थापन समितीची मदत घेतली जात असल्याची माहिती वनरक्षक प्रदीप चव्हाण यांनी लोकमतला दिली.
(वार्ताहर)
जंगलांतील आगी शिकारीसाठी लावल्या जात आहेत. यावर उपाययोजना म्हणून जाळपट्टीसह वणवे विझविण्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार केली असून याद्वारे त्यावर नियंत्रण आणले जात आहे.
- एस. दराडे, सहायक वनसंरक्षक, शहापूर