Join us  

आरेतल्या जंगलात लागलेल्या वणव्यावर नियंत्रण, सहा तासांनंतर अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:44 AM

आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. वृक्ष आणि सुक्या गवताने पेट घेतल्याने तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात आगीचा भडका पसरला. ही आग शहरातील वस्तीपर्यंत पोहोचते की काय? अशी भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे. तब्बत सहा तासांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत असतानाच सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमधील जंगलाला आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम सुरू असतानाच आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला आग लागल्याची छायाचित्रे स्थानिकांनी समाज माध्यमांवर अपलोड केली. मात्र ही छायाचित्रे जुनी आहेत की?; खरेच पुन्हा आग लागली आहे? याची पडताळणी करण्याचे आवाहन केले जात होते. कालांतराने मुंबई महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मुंबई अग्निशमन दलाने येथील आगीबाबत माहिती दिली. डोंगरावरील जंगलाला लागलेल्या आगीचा वणवा पेटत असतानाच ही आग शहराकडे पसरते की काय, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात येथील आग विझण्याचे काम सुरू होते. लोकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन प्रशासनाकडून केले जाते होते.वणवा पेटत असतानाच गोरेगाव येथील गगनचुंबी इमारतीमधील रहिवाशांकडून त्याचे फोटो समाजमाध्यमांवर अपलोड केले जात होते. गोरेगाव, दिंडोशी, फिल्मसिटी येथील नागरिकांकडून आगीचे फोटो काढत सोशल नेटवर्क साइट्सवर अपलोड केले गेले.दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनी येथील मागील बाजूस असलेल्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरवळीने नटलेल्या डोंगराला आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरवर्षी डोंगराला आग लावत डोंगर व हिरवळ, झाडे व झुडपे नष्ट केली जात असल्याचा आरोप येथील साद प्रतिसाद या संस्थेचे संदीप सावंत आणि शरद मराठे यांनी केला.>आगी लागण्यामागे संशयाचा धूरयेथील डोंगर परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हा स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र या आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा संशय स्थानिकांना आहे. त्यामुळेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सज्ज राहावे, असेही प्राणिमित्र संघटना आणि पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे आहे. आगीची झळ जंगलालगतच्या बंगल्यांना बसू नये यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याशी बोललो आणि आग लवकर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला सांगितल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.डोंगरच नष्ट केला जात असून आगीची चौकशी करावी, अशी मागणी गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केली आहे. या आगीप्रकरणी माहिती घेतो, असे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले आहे.

टॅग्स :आरेआग