चर्चवरील हल्ल्यात विदेशी शक्तींचा हात - खडसे
By Admin | Updated: March 24, 2015 01:54 IST2015-03-24T01:54:27+5:302015-03-24T01:54:27+5:30
नवीन पनवेल येथील सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या हल्ल्यामागे राजकीय व्यक्ति अथवा विदेशी शक्तींचा हात असावा अशी आपल्याला शंका असल्याचे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केले.
चर्चवरील हल्ल्यात विदेशी शक्तींचा हात - खडसे
मुंबई : नवीन पनवेल येथील सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या हल्ल्यामागे राजकीय व्यक्ति अथवा विदेशी शक्तींचा हात असावा अशी आपल्याला शंका असल्याचे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केले. खडसे यांच्या या विधानावर बराच गदारोळ झाला. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने शेवटी विरोधकांनी सभात्याग केला.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शून्य तासात पनवेल येथील चर्चवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत अल्पसंख्यकांवर हल्ले वाढत आहेत, असे सांगितले. त्यावर मंदिरांवरही हल्ले होत आहेत, असे वक्तव्य खडसे यांनी केल्याने एकच गदारोळ झाला. संतप्त विरोधी पक्ष सदस्य समोर आले. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत सरकार असंवेदनशील आहे, असा थेट आरोप विरोधकांनी केला. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, पनवेलमधील घटना दुर्देवी आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात कुणी राजकीय व्यक्ती अथवा विदेशाशी संबंध असलेली व्यक्ती सामील असल्याची आपल्याला शंका आहे. सर्वांच्याच रक्षणाची काळजी सरकार घेईल, असे खडसे म्हणाले. मंत्र्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. (विशेष प्रतिनिधी)