रमजाननिमित्त परदेशी फळांची चलती
By Admin | Updated: July 17, 2015 23:05 IST2015-07-17T23:05:57+5:302015-07-17T23:05:57+5:30
रमजान व अधिकमास, आषाढी एकादशी या सर्व सणांमुळे फळांची मागणी वाढली आहे. हापूस आंब्याचा मोसम संपला असून चौसा, दशेरी, लंगडा यासारख्या आंब्याचे प्रकार बाजारात

रमजाननिमित्त परदेशी फळांची चलती
ठाणे : रमजान व अधिकमास, आषाढी एकादशी या सर्व सणांमुळे फळांची मागणी वाढली आहे. हापूस आंब्याचा मोसम संपला असून चौसा, दशेरी, लंगडा यासारख्या आंब्याचे प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. सिमला तसेच साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड येथून आलेल्या ताज्या फळांनीही बाजारात गर्दी केली असून आलुबुखार, पेर, ओले खजूर आदी फळे विक्रेत्यांकडे दिसत आहेत.
शिमल्याहून आलेल्या सफरचंदाबरोबरच न्यूझीलंड वरून आलेली रसाळ सफरचंद विक्रेते १४० रुपये १५० रुपये किलो ने विकत आहेत. कच्छ वरून आलेल्या ओल्या खजुरांबरोबर दुबईतून आलेल्या ओल्या खजुरांची मागणी वाढली आहे.
या सर्व फळांची आवक साधारणपणे जून ते सप्टेंबर महिन्यात अधिक असते असे फळविक्रेत्यांनी सांगितले. तर काही विक्रेत्यांनी सणवार जवळ आल्याने तसेच उपवासासारख्या धार्मिक विधीला फळांचा भरपूर वापर केला जात असल्याने विक्री जोरात होत असल्याचे सांगितले.
ओले खजूर ५० ते १८० रुपये किलो असल्याचे प्रेम गुप्ता या फळविक्रेत्याने सांगितले. आलुबुखार आणि पीच हे फळ चवीला आंबट गोड असून त्यामध्ये अ जीवनसत्व असते. तसेच ही पावसाळी फळे खाल्ल्याने त्त्वचा निरोगी होण्यास मदत होते. बाहेरील देशातून आलेली ही फळे पुढील दोन महिने बाजारात उपलब्ध राहतील, असे फळविक्रेते चंद्रकांत ठक्कर यांनी सांगितले.
पावसाळ्यात मिळणारे हे आलुबुखार मात्र भारतातील असून उन्हाळ्यात मिळणारे आलुबुखार हे आफ्रिकामधील असते, अशी माहिती त्यांनी दिली.
उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या चौसा, दशेरी, लंगडा या तीन्ही आंब्यांची चव वेगवेगळी असल्याने ग्राहक खरेदी करीत आहेत. (प्रतिनिधी)