जेवण पुरविणा-या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य पुरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:41 IST2020-04-11T18:41:09+5:302020-04-11T18:41:32+5:30
मंत्री छगन भुजबळ; केंद्र सरकारची योजना महाराष्ट्रात लागू

जेवण पुरविणा-या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य पुरविणार
मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात विविध स्वयंसेवी संस्थांकडून गरजूंना अन्नधान्य वितरण तसेच अन्नछत्र चालविले जात आहे. या संस्थांना अल्पदरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना(ओएमएसएस) योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
देशात आणि राज्यात कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या काळात स्वयंसेवी संस्थांना सहाय्य करण्याबाबत मंत्री भुजबळ आणि केंद्रीय अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा यात आढावा घेण्यात आला. स्वयंसेवी संस्थांसाठी केंद्र सरकारची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना राज्यात लागू करण्याबाबत विस्ताराने चर्चा झाली.
राज्यात लॉकडाऊनच्या काळात ज्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य वितरण व अन्नछत्रे चालविली जात आहे त्या संस्थाना मागणीनुसार अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थाना २१ रुपये प्रतिकिलो गहू व २२ रुपये प्रतिकिलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गहू व तांदूळ या अन्नधान्याची मागणी एकावेळी कमीत कमी १ मेट्रिक टन ते जास्तीत जास्त १० मेट्रीक टनच्या आसपास असावी. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचा अर्ज करावा.त्यांना जिल्हाधिकाºयांमार्फत भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.