Join us  

वरळीतील क्लिव्हलँड जेट्टीवर ‘फूड कोर्ट' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 11:02 AM

कोळीवाड्यातील खाद्यसंस्कृतीला नवी ओळख.

मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यातील पर्यटनाच्या जोडीलाच तेथील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वादही पर्यटकांना घेता येणार आहे. वरळी कोळीवाड्यातील महिलांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘फूड कोर्ट’ विकसित करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालन देण्यासाठी वरळीतील महिलांना ‘फूड ऑन व्हील’ वाहने पुरविण्यात येतील. क्लिव्हलँड जेट्टीवर महिलांसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

वरळी कोळीवाड्यातील स्थानिक नागरिकांच्या तसेच मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या आणि तक्रारींबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी सायंकाळी वरळी कोळीवाड्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीला पालिका अधिकारी, स्थानिक नागरिक आणि मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. क्लिव्हलँड जेट्टीवर आवश्यक असणारे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना केसरकर यांनी पतन अभियंता तसेच मत्स्योद्योग विभागाला दिल्या. तसेच ‘फूड कोर्ट’ विकसित करण्याच्या अनुषंगाने आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे निर्देश देखील त्यांनी पालिकेला दिले आहेत.

 स्थानिक पातळीवर महिला बचतगट किंवा स्वयंसेवी संस्थांना फूड ऑन व्हीलची जबाबदारी देण्यात येईल.

 या व्हॅनमध्ये महिलांना अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठीचे कप्पे तयार करण्यात येणार आहेत.

 फूड स्टॉलच्या माध्यमातून सेवा सुविधा देण्याची या व्हॅनची रचना असणार आहे.

 रोजगार मिळतानाच कोळीवाड्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, हा संकल्पनेचा उद्देश आहे.

ड्रायर मशीनने मासळी सुकविणार :

वरळी कोळीवाड्यातील महिलांसाठी रोजगार निर्मितीचे साधन म्हणून मासळी सुकविण्यासाठी अत्याधुनिक असे सौरऊर्जा आधारित ‘ड्रायर मशीन’ही पुरविण्यात येणार आहेत. तसेच मासळी साठवण्यासाठी शीतगृहाची सुविधा पुरविण्यात येईल. वरळी कोळीवाड्यातील मासळी मंडईचे काम हे महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले. 

टॅग्स :नगर पालिकावरळीदीपक केसरकर