राणीच्या बागेत पहायला मिळणार फुलांचे हत्ती, वाघ,झेब्रा ; अॅनिमल किंग्डम संकल्पना

By सीमा महांगडे | Published: January 30, 2024 09:45 PM2024-01-30T21:45:58+5:302024-01-30T21:46:05+5:30

२ फेब्रुवारीपासून फळझाडे-फुलझाडे प्रदर्शन

Flower elephants, tigers, zebras will be seen in the queen's garden; | राणीच्या बागेत पहायला मिळणार फुलांचे हत्ती, वाघ,झेब्रा ; अॅनिमल किंग्डम संकल्पना

राणीच्या बागेत पहायला मिळणार फुलांचे हत्ती, वाघ,झेब्रा ; अॅनिमल किंग्डम संकल्पना

मुंबई:  दरवर्षीप्रमाणे यंदाही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात फळे, भाज्या, विविध प्रजातींची झाडे, फुले यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात झाडे, फळे, भाज्या, फुले यांचे महत्त्व प्रत्येकाला समजावे, पर्यावरण विषयी आवड निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश असणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात ‘ॲॅनिमल किंग्डम' हे पर्यावरणप्रेमींचे आकर्षण ठरणार आहे. दरम्यान, २ ते ४ फेब्रुवारी हे प्रदर्शन आयोजित केले असून सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. 

पालिका प्रशासन व वृक्ष प्राधिकरणाद्वारे दरवर्षी आयोजित होणारे वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे हे २७ वे वर्ष आहे. राणी बागेत यंदा या भव्य प्रदर्शनाचे म्हणजेच ‘फ्लॉवर शो’चे  येत्या शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. दरवर्षीच्या वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करून वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांना देखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करून लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. २०१५ पासून या प्रदर्शनाला विविध सृजनशिल कल्पनांची जोड देण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी एक वेगळा विषय घेवून हे प्रदर्शन मांडण्यात येते. यंदाच्या प्रदर्शनाचा विषय ‘अॅनिमल किंग्डम’हा आहे. यात बागेच्या प्रवेशद्वाराजवळच झाडे, पाना-फुलांपासून हत्ती, वाघ आणि झेंब्रा आदी प्राण्यांच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. याशिवाय प्रदर्शनात दहा हजार कुंड्या मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाल्याचा समावेश असेल. समवेत, खास आकर्षण म्हणून परदेशातील काही निवडक भाजीपालादेखील या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

वास्तुविशारद विद्यार्थी घेणार धडे-

यंदाच्या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उद्यान विभागामार्फत मुंबईतील विविध वास्तुविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचा अनुभव घेता यावा, यासाठी दिनांक ३१ जानेवारी आणि दिनांक १ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसांत विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये आय. ई. एस. महाविद्यालय, एल. एस. रहेजा महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, ज. जी. स्कूल ऑफ आर्टस् व रचना संसद महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास १५०-२०० विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेणार असल्याचे उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना एखादे प्रदर्शन कसे मांडतात, त्यातील लॅण्डस्केपिंगचे डिझाईन कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक पहायला आणि अभ्यासाला मिळणार आहे.

 

Web Title: Flower elephants, tigers, zebras will be seen in the queen's garden;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.