राज्यातील साडेचारशेहून अधिक शाळांना पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:52+5:302021-07-30T04:05:52+5:30

विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करण्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय ...

Floods hit more than 450 schools in the state | राज्यातील साडेचारशेहून अधिक शाळांना पुराचा फटका

राज्यातील साडेचारशेहून अधिक शाळांना पुराचा फटका

Next

विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करण्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्य प्रणालीमार्फत झालेल्या बैठकीच्या माध्यमातून घेतली. राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, पालघर, पुणे अशा नऊ जिल्ह्यांतील एकूण ४५६ शाळा या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाल्याचे प्राथमिक पाहणीतून आढळले आहे. या शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करून तेथे लवकर शिक्षण सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी नव्याने पाठ्यपुस्तके पुरविण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी नियोजन करून ऑफलाईन, ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करावी, नुकसान झालेल्या शालेय पोषण आहारातील तांदूळ व धान्य आदी वस्तूंचा पुरवठा पुन्हा करण्यात यावा, पूरस्थितीमुळे उद्‍भवणाऱ्‍या आजारांचा विचार करून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आणि पुरामुळे अनाथ बनलेल्या मुलांसाठी पर्यायी वसतिगृहाच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही गायकवाड यांनी दिल्या.

साडेचारशे शाळांचे नुकसान

राज्यात साडेचारशेहून अधिक शाळांचे नुकसान झाले आहे. यात काही ठिकाणी वर्गखोल्यांचे तसेच वर्गखोल्यांच्या संरक्षक भिंती, छप्पर यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा व गगनबावडा या दोन तालुक्यातील शाळांमधील शालेय पोषण आहारांतर्गत प्राप्त तांदूळ व धान्याचे नुकसान झाले आहे. या सर्व शाळांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अंदाजे २८ कोटी २० लाख ७६ हजार रुपयांपर्यंतची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे, अशीही माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.

स्वयंअध्ययनासाठी पुस्तिका, हॅम रेडिओ, स्थानिक टीव्ही

- सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ३८ शाळा पुरामुळे बाधित झाल्या. येथे ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेत अडचण येत होती. या परिस्थ‍ितीत महाबळेश्वर पंचायत समितीमार्फत ‘माझी दैनंदिनी’ या उपक्रमांतर्गत स्वयंअध्ययनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवरून ‘टीव्हीवरील शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांना टीव्हीवरून अभ्यासक्रम शिकवित आहेत.

- रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण भागातील तळीये, सह्याद्रीवाडी येथे शाळेसोबत संपूर्ण गावाचेच पुनर्वसन करावे लागणार आहे. या भागात ऑफलाईन शिक्षणाबरोबरच हॅम रेडिओच्या माध्यमातून शिक्षण देण्याची सुरुवात येत्या १० ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Floods hit more than 450 schools in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.