..अन् एका प्रवाशासाठी ३६० सीटर विमानाचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:05 IST2021-05-27T04:05:58+5:302021-05-27T04:05:58+5:30

मुंबई : सीट फुल झाल्याशिवाय आपल्याकडे वडापही मार्गस्थ होत नाही. पण ३६० सीटर विमान केवळ एका प्रवाशाला घेऊन मुंबईहून ...

..Flight of 360 seater aircraft for one passenger | ..अन् एका प्रवाशासाठी ३६० सीटर विमानाचे उड्डाण

..अन् एका प्रवाशासाठी ३६० सीटर विमानाचे उड्डाण

मुंबई : सीट फुल झाल्याशिवाय आपल्याकडे वडापही मार्गस्थ होत नाही. पण ३६० सीटर विमान केवळ एका प्रवाशाला घेऊन मुंबईहून दुबईला रवाना झाल्याचे समोर आले आहे. भावेश झवेरी असे या प्रवाशाचे नाव असून, त्यांनी या प्रवासासाठी केवळ १८ हजार रुपये मोजले आहेत.

संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) भारतीय प्रवाशांवरील बंदी १४ जूनपर्यंत वाढविली आहे. यूएईचे नागरिक, गोल्डन व्हिसाधारक आणि शासकीय मोहिमेवर असलेल्यांनाच यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातीत जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

अमिरात एअरलाइन्सच्या ‘इके ५०१’ या बोइंग ७७७ विमानाची मुंबई ते दुबई फेरी १९ मे रोजी नियोजित होती. केवळ एका प्रवाशाने बुकिंग केल्याने कंपनीही चिंतित होती. शेवटच्या तासापर्यंत आणखी बुकिंग न मिळाल्याने भावेश झवेरी या गोल्डन व्हिसाधारक प्रवाशाला घेऊन विमान मार्गस्थ करावे लागले. विमानात एकच प्रवासी असला तरी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवेत कोणतीही कसूर सोडली नाही.

तुम्ही एकमेव प्रवासी या विमानातून प्रवास करणार आहात, असे कर्मचाऱ्यांनी सांगताच भावेश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी या अनोख्या प्रवासाचे चित्रीकरण केले. विमान कर्मचाऱ्यांसाठीही हा प्रकार नवीन होता. त्यांनी भावेश यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. वैमानिक खास त्यांना भेटण्यासाठी प्रवेशद्वारावर आला. एकमेव प्रवाशाला या अद‌्भुत प्रवासाचा आनंद देण्याची खबरदारी केबिन क्रूनी घेतली. सर्व सूचना भावेश झवेरी यांच्या नावाने देण्यात आल्या. मिस्टर झवेरी सिटबेल्ट बांधा, आता आपण लँडिंगसाठी तयार आहोत वैगरे वैगरे. अशा अनोखी हवाई सफरीचा आनंद घेणारा मी पहिलाच व्यक्ती असेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दुबईत पोहोचल्यावर व्यक्त केली.

आठ लाखांचे इंधन खर्च

बोइंग ७७७ (डबल इंजिन विमान) हे जगातील सर्वात मोठे विमान म्हणून ओळखले जाते. मुंबई - दुबई अंतर ते अडीच तासांत कापते. त्यासाठी १७ टन इंधन लागते. त्याचे बाजारमूल्य जवळपास आठ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्र सर्वाधिक तोट्यात असताना एका प्रवाशासाठी इतका खर्च विमान कंपनीला परवडला कसा, हा सवाल उपस्थित होत आहे.

फोटो आहे - २६ भावेश झवेरी

Web Title: ..Flight of 360 seater aircraft for one passenger